#Ghugus
• लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे ग्रामीण महिलांसाठी व शेतकऱ्यांसाठी मशरूम प्रशिक्षण कार्यशाळा
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : ग्रामीण महिलांना व स्थानिक शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लॉईड्स इन्फिनाईट फाउंडेशन यांच्या वतीने दि. ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा, येथे मशरूम उत्पादन विषयक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात ४० ग्रामीण महिला व शेतकरी सहभागी झाले होते. सदर प्रशिक्षण केपीएस मशरूमचे तज्ज्ञ प्रशिक्षक श्री. प्रविण बकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. हा कार्यक्रम लॉईड्स इन्फिनाईट फाउंडेशन च्या सहकार्याने यशस्वीरीत्या राबविण्यात आला.
प्रशिक्षणादरम्यान प्रविण बकाडे यांनी मशरूम उत्पादनाचे महत्त्व व त्याचे आर्थिक फायदे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये मशरूमचे विविध प्रकार, लागवड पद्धती, उत्पादन तंत्रज्ञान, देखभाल व व्यवस्थापन, तसेच मशरूमच्या औषधी गुणधर्म यांबरोबरच आरोग्यविषयक फायदे यांची माहिती देण्यात आली. तसेच प्रशिक्षणार्थींना मशरूम बीज (स्पॉन) निर्मितीची प्रक्रिया, दर्जेदार व रोगमुक्त बीजाची निवड, तसेच मशरूम लागवडीसाठी आवश्यक ग्रोईंग मीडिया म्हणून भाताच्या पेंढ्याच्या, तुरीच्या किंवा सोयाबीन कुटार ची निवड, कापणी, भिजवणे व निर्जंतुकीकरण (स्टेरिलायझेशन) प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मशरूम उत्पादनासाठी आवश्यक तापमान व आर्द्रतेचे शास्त्रीय नियंत्रण, उत्पादनासाठी अनुकूल वातावरण निर्मिती, इन्क्युबेशन कालावधीतील काळजी, पॉलिथिन पिशव्यांमध्ये पेंढा व बीज भरण्याची योग्य पद्धत, तसेच मशरूम बेड तयार करून बांधण्याची व टांगण्याची पद्धत याचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.
यासोबतच मशरूम उत्पादनासाठी आवश्यक किमान क्षेत्रफळ, स्वच्छता व्यवस्थापन, तापमान टिकवून ठेवण्याच्या पद्धती, उत्पादन काळातील रोग व कीड व्यवस्थापन, उत्पादन तंत्रज्ञान, अपेक्षित उत्पादनक्षमता, तसेच मशरूमच्या बाजारपेठेतील संधी, विक्री व्यवस्था व मूल्यवर्धित उत्पादने याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षणामध्ये मुरसा, बेलसणी व म्हातारदेवी येथील महिला तसेच शेतकरी बांधवांनी प्रशिक्षणासाठी सहभाग घेतला. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण महिलांना व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होऊन आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे सहभागी प्रशिक्षणार्थींनी सांगितले.
