#Bramhpuri #chandrapur
• ब्रह्मपुरीत शिक्षक व कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू
सुवर्ण भारत: रोहित मेश्राम (तालुका प्रतिनिधी, ब्रम्हपुरी )
ब्रह्मपुरी :- येथील स्थानिक ख्रिस्तानंद स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार, १३ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. विद्यालयासमोर, बं. राजाभाऊ खोब्रागडे चौकात हे आंदोलन छेडण्यात आले असून गेल्या पाच-सहा महिन्यांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही तोडगा न निघाल्याने हा निर्णय घेतल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
आंदोलनस्थळी शिक्षक आमदार सुधाकर अडबले, विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार अतुल देशकर, शिवसेना प्रमुख भूपण रामटेके तसेच डॉ. मिलिंद भगणे यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासकीय स्तरावर या मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पत्रकार परिषदेत कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, पगाराची (Basic, DA, HRA) विभागणी न करता संपूर्ण पगाराची नोंद पगारबुकावर करावी. महागाईच्या तुलनेत योग्य पगारवाढ द्यावी. ग्रॅच्युइटीची रक्कम शेवटच्या संपूर्ण पगारावर आधारित असावी तसेच ईपीएफ कपात मूळ पगाराच्या १२ टक्के प्रमाणे जमा करावी. शासन निर्णयानुसार किरकोळ, वैद्यकीय व अर्जित रजा घेण्याची मुभा द्यावी. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्याची लेखी प्रत द्यावी. तसेच शुल्लक कारणांवरून शो-कॉज नोटीस देणे, कामावरून काढण्याची धमकी देणे आणि मोबाईल बंदीची सक्ती करणे यावर तात्काळ रोक लावावी, अशी मागणी त्यांनी केली.
“आम्ही मागील पाच-सहा महिन्यांपासून शाळा प्रशासनाला निवेदने देत आहोत; मात्र अद्याप समाधानकारक लेखी उत्तर मिळालेले नाही. प्रशासनाच्या जाचक अटी व त्रासाला कंटाळून अखेर आम्हाला हे पाऊल उचलावे लागले,” असे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
जोपर्यंत शाळा प्रशासनाकडून मागण्यांची लेखी पूर्तता केली जात नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
