• गोंडपिंपरी पोलिसांची धडक कारवाई
• ५ पिक-अपसह ४६ गोवंशीय जनावरांची सुटका; ५०.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
सुवर्ण भारत:सुनील हिंगणकर (विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर)
गोंडपिंपरी : अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या तस्करांविरुद्ध गोंडपिंपरी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत ५ पिक-अप वाहने जप्त केली आणि ४६ गोवंशीय गाय व बैलांची सुटका केली. या कारवाईत तब्बल ५० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीवरून नाकाबंदी
पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, गडचिरोली येथून तेलंगणा राज्यात ५ पिक-अप वाहनांद्वारे गोवंशीय जनावरांची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे मौजा वढोली येथे पहाटे नाकाबंदी करण्यात आली.
सकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास संशयित पिक-अप वाहने येताना दिसताच पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा दिला.
दोन आरोपी ताब्यात, चौघे फरार
समोरील वाहन थांबवून मोहसीन आयुब खान (४०, रा. वाकडी, जि. आसिफाबाद) आणि मोहम्मद मंजूर अली (४२, रा. माजीदवाडा, ता. वाकडी, जि. आसिफाबाद, तेलंगणा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
मात्र मागील चार वाहनचालकांनी पोलिसांची चाहूल लागताच वाहने वळवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग केला असता वढोली नदी पुलाजवळ त्यांनी वाहने सोडून शेतशिवारात पळ काढला. परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र ते पसार होण्यात यशस्वी झाले.
५० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
जप्त करण्यात आलेल्या ५ पिक-अप वाहनांमधून एकूण ४६ गोवंशीय गाय व बैल (किंमत सुमारे ९ लाख २० हजार रुपये) तसेच ५ पिक-अप वाहने (किंमत सुमारे ४१ लाख रुपये) असा एकूण ५० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे व त्यांच्या पथकाने केली.
या धडक कारवाईमुळे गोवंशीय जनावरांच्या अवैध तस्करीवर मोठा आळा बसला असून परिसरात पोलिसांच्या कार्यवाहीचे कौतुक होत आहे.
