Home Breaking News #Chimur दुचाकी व ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; एकाची प्रकृती चिंताजनक

#Chimur दुचाकी व ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; एकाची प्रकृती चिंताजनक

100

#Chimur दुचाकी व ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; एकाची प्रकृती चिंताजनक

सुवर्ण भारत : सुनिल हिंगणकर (विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर)

चंद्रपूर : चिमूर-नेरी मार्गावर आज दुपारी दुचाकी व ट्रॅव्हलर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हितेश कचरुजी गुरुनुले (वय २७) आणि आशिष मन्सराम श्रीरामे (वय २९, दोघेही रा. खुटाळा) हे औषधे आणण्यासाठी नेरीकडे जात होते. त्याच वेळी नेरीकडून भरधाव वेगात येणाऱ्या MH40 AK 7898 क्रमांकाच्या ट्रॅव्हलरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले आणि दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. हितेश गुरुनुले यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, अपघातग्रस्त ट्रॅव्हलर व दुचाकी वाहन चिमूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून ट्रॅव्हलर चालक अमोल गिरडे (रा. नेरी) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास चिमूर पोलीस करत आहेत.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भरधाव वेगामुळेच हा अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.