#Gadchiroli #etapalli
• माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या प्रेरणेतून डुम्मे येथे भव्य ग्रामीण क्रीडा महोत्सव जल्लोषात संपन्न
सुवर्ण भारत: शंकर महाकाली(संपादक

)
एटापल्ली : ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या डुम्मे येथील भव्य ग्रामीण क्रीडा महोत्सवाचा समारोप उत्साह, जल्लोष आणि दिमाखदार वातावरणात झाला. जय बजरंग क्लब, डुम्मे यांच्या पुढाकारातून आयोजित या महोत्सवाने परिसरातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
महोत्सवाला माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेने आणि सहकार्यामुळे स्पर्धांना विशेष उंची प्राप्त झाली. स्पर्धांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना राजे साहेबांच्या तर्फे आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांनी दूरध्वनीद्वारे आयोजक व खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या जिद्दीचे व क्रीडाभावनेचे कौतुक केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
समारोप व बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद पुलूरवार (तालुका अध्यक्ष, भाजपा एटापल्ली) व जिल्हा सचिव मोहन नामेवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून राकेश हिरा (तालुका महामंत्री), पत्रकार राकेश टेलकुंटलवार, कैलास उसेंडी (सरपंच), बाळू आत्राम (उपसरपंच, ग्रामपंचायत गुरुपल्ली), जोगाजी दुर्वा (गाव भूमिया, डुम्मे), दुलसा पुंगाटी (अध्यक्ष, जय बजरंग क्लब), यशवंत दहागावकर सर, कु. सुमनताई पुंगाटी तसेच सरिताताई मडावी (महिला पोलीस हवालदार) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्यांसह विविध पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि संघभावना यांचे प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली. सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण अधिक रंगतदार केले.
या ग्रामीण क्रीडा महोत्सवामुळे परिसरात एकात्मता, बंधुभाव आणि क्रीडासंस्कृतीला चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत दहागावकर सर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन अक्षय पुंगाटी (युवा सामाजिक कार्यकर्ते) यांनी केले. मोठ्या संख्येने ग्रामस्थ, युवक-युवती आणि क्रीडाप्रेमी उपस्थित राहिल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

