#Chandrapur
चंद्रपूर अवैध गोवंशीय वाहतूक करणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात
सुवर्ण भारत: सुनील हिंगणकर
विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर : दिनांक 24 फेब्रुवारी 2026 – उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे पडोलीच्या पथकाने भद्रावती ते चंद्रपूर मार्गावर अवैध गोवंशीय वाहतूक करणाऱ्या तिघा आरोपींना पकडले.
गोपनिय माहीतीदारा कडून मिळालेल्या माहितीवरुन पोलीसांनी ताडाळी पुलीया खालून सापळा रचला असता, अंदाजे सकाळी 10.30 वाजता दोन चार चाकी वाहनांमध्ये गोवंशीय जनावरांची वाहतूक होताना दिसून आली. थांबण्याचा इशारा दिल्यानंतर वाहन चालकांनी थांबले.
पहिल्या टाटा इन्ट्रा वाहन क्रमांक MH-34-BG-9320 मध्ये चालक नंदकिशोर श्रीराम नन्नावारे (वय 23, रा. सोनेगाव, चिमुर) व सोबत बसलेले शिवसागर चंद्रभान सुखदेवे (वय 50, रा. मासळ, चिमुर) आढळले. दुसऱ्या वाहन क्रमांक MH-34-BG-9792 मध्ये चालक प्रशांत धानबा दोडके (वय 25, रा. बरजघाट, चिमुर) होता.
दोन्ही वाहनांची तपासणी केली असता, प्रत्येक वाहनात तीन-तीन गोवंशीय (बैल) जनावरे आढळली. ही जनावरे अत्यंत निर्दयतेने वाहतूक केली जात होती. आरोपींना वैध परवाना विचारल्यावर त्यांनी कोणताही परवाना नसल्याचे कबूल केले. शिवसागर सुखदेवे यांनी सांगितले की जनावरे त्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केली असून गडचांदूर बाजारात विक्रीसाठी नेत आहेत.
जप्त करण्यात आलेल्या सहा नग गोवंशीय जनावरांची किंमत अंदाजे ₹90,000 तर वाहने व इतर मुद्देमाल मिळून ₹6,40,000 इतकी झाली. जप्त जनावरे प्यार फाऊंडेशन, चंद्रपूर येथे चारा-पाणी व सुरक्षिततेसाठी ठेवण्यात आली आहे.
या प्रकरणी नंदकिशोर नन्नावरे, शिवसागर सुखदेवे व प्रशांत दोडके यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी सांगितले.





