#Ghugus
• लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनचा स्वच्छतेसाठी पुढाकार;
• ८ ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे वितरण
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घूस : ग्रामीण भागातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या वतीने परिसरातील आठ ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे वितरण करण्यात आले. मुरसा येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते या वाहनांच्या चाव्या संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंचांना सुपूर्द करण्यात आल्या.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. ग्रामीण भागात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “ही वाहने डिझेलमुक्त असून पर्यावरणपूरक आहेत. ग्रामपंचायतींनी या वाहनांच्या माध्यमातून ओला व सुका कचरा वेगळा संकलित करून स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी शेतीतील बदलत्या प्रवाहावरही भाष्य केले. “कापूस व सोयाबीनसारख्या पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण पिकांची लागवड करावी. भाजीपाला उत्पादनासारख्या आधुनिक प्रयोगांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चित वाढ होऊ शकते,” असे त्यांनी सांगितले.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी यांनी प्रास्ताविकात फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. ग्रामीण भागात स्वच्छता, शेती, आरोग्य, शिक्षण, जलसंवर्धन तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुसज्ज कौशल्य विकास केंद्रही उभारण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमांतर्गत उसगाव, मुरसा, म्हातारदेवी, पांढरकवडा, धानोरा, नकोडा, शेणगाव आणि वढा या आठ ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक वाहने देण्यात आली.
गावांमध्ये कचऱ्याचे शास्त्रोक्त संकलन करून स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला लाभार्थी गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी फाउंडेशनच्या या सामाजिक बांधिलकीचे स्वागत केले.





