Home Breaking News • जनसेवेचा ‘आरसा’ ठरलेल्या ‘आयर्न लेडी’ मालाताई मेश्राम यांची सभापतीपदी झेप ...

• जनसेवेचा ‘आरसा’ ठरलेल्या ‘आयर्न लेडी’ मालाताई मेश्राम यांची सभापतीपदी झेप • बेलोरा-नायगाव डीप ओसीएमतर्फे कर्तृत्वाचा गौरव

217
Oplus_131072

• जनसेवेचा ‘आरसा’ ठरलेल्या ‘आयर्न लेडी’ मालाताई मेश्राम यांची सभापतीपदी झेप

• बेलोरा-नायगाव डीप ओसीएमतर्फे कर्तृत्वाचा गौरव

सुवर्ण भारत : पंकज रामटेके, सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर

घुग्घुस : समाजकार्याची नाळ आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची जिद्द यामुळे घुग्घुस शहरात ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या माला मेश्राम यांची घुग्घुस नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे. अपक्ष नगरसेविका म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज लोकसेवेच्या मुख्य प्रवाहात झेपावला असून त्यांच्या निवडीचे शहरभर स्वागत होत आहे.

रामनगर प्रभाग क्रमांक २ मधून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झालेल्या मालाताईंनी राजकारणासोबत समाजकार्यातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या त्या बी.एस.डब्ल्यू. द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत असून शिक्षण आणि समाजकार्य यांचा सुंदर समतोल साधत आहेत.

आदर्श एकता महिला मंडळ, रामनगर ’च्या अध्यक्ष म्हणून त्यांनी महिलांना संघटित करण्याचे आणि त्यांच्या समस्या मांडण्याचे काम सातत्याने केले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवून त्यांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १४ एप्रिल रोजी पाणपोई उभारणे, हिवाळ्यात गरजूंना ब्लँकेटचे वितरण करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदतीचा हात देणे अशा विविध सेवाभावी उपक्रमांमुळे त्या समाजात आदराचे स्थान मिळवू शकल्या आहेत. तसेच ८ मार्च ‘जागतिक महिला दिना’निमित्त महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षा विषयक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करून त्यांनी महिलांमध्ये जागृती घडवली आहे.

नवनियुक्त सभापती माला मेश्राम यांचे पती अरुण मेश्राम हे बेलोरा-नायगाव डीप ओसीएम येथे कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल बेलोरा-नायगाव डीप ओसीएमच्या वतीने मालाताईंचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी सुनील बिपटे, राजू खोके, बंडू खंडारे, वैष्णव झाडे, विजय रोगे, संकेत खोकले, राज जाधव, रेखा वाढई, ललिता विधाते यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. मालाताईंच्या निवडीमुळे घुग्घुस शहरातील महिला व बालकांच्या प्रश्नांना न्याय मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

रेल्वे पुलासाठी लढा; ‘आयर्न लेडी’ची ओळख

घुग्घुस शहरातील प्रलंबित रेल्वे पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मालाताई मेश्राम यांनी प्रशासनाविरोधात ठाम भूमिका घेत आंदोलन केले होते. या संघर्षामुळे शहरातील नागरिकांनी त्यांना ‘आयर्न लेडी’ ही उपाधी दिली. जनतेच्या प्रश्नांसाठी निर्भीडपणे लढण्याची त्यांची हीच भूमिका आता सभापतीपदाच्या जबाबदारीतून अधिक प्रभावीपणे पुढे येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.