#Gadchiroli
• दक्षिण गडचिरोलीतील रस्ते विकासाला अर्थसंकल्पातून बळ
• आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या पाठपुराव्याला यश
• अहेरी मतदारसंघासाठी २५ कोटींचा निधी
सुवर्ण भारत:शंकर महाकाली(संपादक)
गडचिरोली:अहेरी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दक्षिण गडचिरोलीच्या पायाभूत विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांना यश मिळत अहेरी मतदारसंघातील विविध रस्ते विकास कामांसाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे अहेरी शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यास मोठी मदत होणार असून विकासकामांना गती मिळणार आहे.
अहेरी शहरातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून शहरातील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. आता या निधीमुळे शहरातील रस्ते रुंद व सुस्थितीत होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याशिवाय चंद्रपूर (घंटाचौकी) – मुलचेरा – आलापल्ली राज्य मार्ग क्रमांक ३७० अंतर्गत मार्कंडा (देव) ते गोमणी या रस्त्याच्या बांधकामासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मार्गामुळे परिसरातील गावांचा संपर्क अधिक सुलभ होणार आहे. तसेच सिरोंचा व अहेरी तालुक्यातील रोमपल्ली – झिंगानूर कोपेला (जिल्हा मार्ग क्र. २६) या रस्त्याच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रातून सिरोंचा व भामरागड दिशेने जाणाऱ्या काही प्रमुख मार्गांची दर्जोन्नती करून ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहेत. या राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू असताना राज्य व जिल्हा स्तरावरील रस्त्यांचे जाळेही मजबूत असणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यातूनच या अर्थसंकल्पात मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्ते विकास कामांसाठी मोठा निधी मंजूर करण्यात यश मिळाले आहे.
दरम्यान, मुलचेरा – आलापल्ली मार्गाची दुरवस्था झाल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून वारंवार दुरुस्तीची मागणी होत होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत संबंधित रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रातील इतर अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठीही शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली असून लवकरच आणखी कामांना मंजुरी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निधीमुळे अहेरी मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार असून व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



