गडचांदूर येथे साईकृपा बेकरीला भीषण आग; लाखोंचे नुकसान
सुवर्ण भारत: मनोज गोरे
गडचांदूर : येथील मुख्य बसस्थानक परिसरातील साईकृपा बेकरीला मंगळवारी रात्री सुमारे ९.१५ वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत बेकरीतील यंत्रसामग्री, फर्निचर, कच्चा माल तसेच तयार खाद्यपदार्थ जळून खाक झाले असून, दुकानमालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री बेकरीमधून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तत्काळ हालचाल सुरू केली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गडचांदूर नगर परिषद अग्निशमन दल तसेच माणिकगड व अंबुजा सिमेंट कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तिन्ही पथकांनी संयुक्तपणे पाण्याचा मारा करत अथक प्रयत्न केल्यानंतर काही तासांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
