बल्लारपूर नगरपरिषदेचा अतिक्रमणांविरुद्ध सक्त कारवाईचा इशारा
सुवर्ण भारत: शंकर महाकाली

बल्लारपूर : 01 एप्रिल 2026 बल्लारपूर शहरातील रहदारी रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि नाल्यांवरील अतिक्रमणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांची नाराजी वाढली आहे. सतत मिळत असलेल्या तक्रारींचा विचार करून बल्लारपूर नगरपरिषदेने अतिक्रमणांविरुद्ध सक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शहरातील वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करणारी सर्व स्थायी आणि तात्पुरती बांधकामे, दुकाने, वाहन पार्किंग व इतर अतिक्रमण सोमवार, दिनांक 06 एप्रिल 2026 पर्यंत संबंधित व्यक्ती किंवा व्यावसायिकांनी स्वतःच्या खर्चाने हटवावीत.
नगरपरिषदेने स्पष्ट केले की, या मुदतीनंतर कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय प्रशासन थेट अतिक्रमण हटविण्यात येईल. तसेच, या कामासाठी लागणारा संपूर्ण खर्च संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाईल.
बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी सांगितले, “नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा व्यावसायिकांविरुद्ध प्रचलित कायद्यांनुसार दंडात्मक कारवाई देखील केली जाईल. आमचे उद्दिष्ट शहरातील सुव्यवस्था राखणे, वाहतूक सुचारू ठेवणे आणि स्वच्छता कायम ठेवणे आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.”
नगरपरिषदेच्या या निर्णयामुळे बल्लारपूर शहरातील अतिक्रमण कमी होऊन रहदारी सुधारण्याची आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.




