बल्लारपूर : हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा रूट मार्च, सुरक्षिततेसाठी सज्ज
सुवर्ण भारत :शंकर महाकाली
बल्लारपूर : आगामी २ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव साजरा होण्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बल्लारपूर पोलिसांनी आज विशेष रूट मार्च आयोजित केला. हा रूट मार्च नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासोबतच उत्सव काळात कोणत्याही अनुचित घटनेचा प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या रूट मार्चची सांगता पोलीस स्टेशन बल्लारपूर येथून सुरू झाली. गोल पुलिया, सिद्धार्थ वॉर्ड, गांधी पुतळा, जामा मस्जिद, असमा चौक या संवेदनशील मार्गांवरून पुनः पोलीस स्टेशनवर आल्यावर रूट मार्च पूर्ण झाले.
रूट मार्चदरम्यान पोलिसांनी मार्गावरील संवेदनशी
ल ठिकाणांचा सखोल आढावा घेतला आणि नागरिकांना शांती व सौहार्द राखण्याचे आवाहन केले. पोलिसांनी मार्गावर तैनात असलेल्या जवानांमार्फत आवश्यक सुरक्षा उपाय योजले, तर शहरातील नागरिकांना हनुमान जयंतीच्या उत्सवात सहभाग घेताना सावधगिरी बाळगण्याचे मार्गदर्शन केले.
या रूट मार्चमध्ये एकूण ६ अधिकारी, २५ पोलीस कर्मचारी आणि ८ सैनिक सहभागी झाले. त्यात पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम, विक्की लोखंडे, वैभव चव्हाण आणि मनोहर मडावी यांचा समावेश होता.
पोलिस प्रशासनाने यावेळी हनुमान जयंती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनीही पोलीसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्सवाचे वातावरण सुरक्षित ठेवण्यासाठी रस्त्यांवर अतिरिक्त प्रकाशयोजना आणि तातडीच्या परिस्थितीत तत्पर असलेले पोलिस पथक तैनात करण्यात आले आहेत. या प्रकारच्या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये उत्सवाच्या आधीच सुरक्षिततेची भावना वाढली आहे.
पोलिसांच्या या पुढाकारामुळे बल्लारपूर शहरात हनुमान जयंती उत्सव निश्चिंतपणे, आनंदाने आणि शांतीत साजरा करण्याची तयारी झाली आहे.





