Home Breaking News दुर्गापूरमध्ये किरकोळ वादातून रक्ताचा सडा; तरुणाची ‘नोकुली’ने भोसकून निर्घृण हत्या! चंद्रपूर:...

दुर्गापूरमध्ये किरकोळ वादातून रक्ताचा सडा; तरुणाची ‘नोकुली’ने भोसकून निर्घृण हत्या! चंद्रपूर: शहरात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; आरोपीही जखमी, दुर्गापुरात तणावपूर्ण शांतता

430

दुर्गापूरमध्ये किरकोळ वादातून रक्ताचा सडा; तरुणाची ‘नोकुली’ने भोसकून निर्घृण हत्या!

चंद्रपूर: शहरात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; आरोपीही जखमी, दुर्गापुरात तणावपूर्ण शांतता

चंद्रपूर : क्षुल्लक कारणावरून उफाळलेल्या वादाचे पर्यावसान गुरुवारी दुपारी एका थरारक हत्याकांडाने झाले. दुर्गापूर परिसरात एका तरुणाची बर्फ तोडण्याच्या धारदार ‘नोकुली’ने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला असून, भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यश फाले या तरुणाचा अंत
यश हरिदास फाले (वय २५, रा. कोंडी वॉर्ड नं. ५, दुर्गापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रफुल महाराणे याला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा कोयना गेट परिसरात नाश्ता आणि लस्सीचे दुकान चालवतो. मिळालेल्या माहितीनुसार, मृत यश आणि आरोपी प्रफुल यांच्यात बुधवारपासून कोणत्यातरी कारणावरून धुसफूस सुरू होती. या वादाचे रूपांतर गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास रक्तरंजित संघर्षात झाले.
भररस्त्यात थरार: बर्फाच्या सुयाने पोट फाडले
गुरुवारी दुपारी दोघे पुन्हा आमनेसामने आले असता त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. रागाच्या भरात असलेल्या प्रफुलने दुकानातील बर्फाची लादी तोडण्यासाठी वापरली जाणारी टोकदार ‘नोकुली’ (सुया) काढली आणि यशच्या पोटात खोलवर वार केले. हा वार इतका भीषण होता की, यश जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. परिसरातील नागरिक काही समजण्याच्या आतच सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. या झटापटीत आरोपी प्रफुल हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात पोलीस पहाऱ्यात उपचार सुरू आहेत.
पोलीस दलात खळबळ
घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपर पोलीस अधीक्षक गौरव कायदेपंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, जुन्या वादातून ही टोकाची पायरी उचल्याचे बोलले जात आहे.
> दहशतीखाली दुर्गापूर परिसर
> या घटनेमुळे दुर्गापूर परिसरात सध्या भीतीचे सावट आहे. किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये वाढणारी हिंसक प्रवृत्ती आणि कायद्याचा धाक उरला नसल्याची भावना सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.