• मुख्याधिकारी रांजनकरांच्या हकालपट्टीसाठी घुग्घूस-कोरपना एकवटले!
• विकासाचा निधी परत गेल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीचा पाढा
सुवर्ण पदक: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
घुग्घूस/कोरपना : चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे घुग्घूस नगर परिषद आणि जिल्ह्यातील दुसऱ्या टोकाला असलेली कोरपना नगर पंचायत, या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध सत्ताधारी सदस्यांनी ‘एल्गार’ पुकारला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी निलेश रांजनकर हेच मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे शहरांचा विकास खुंटल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरू लागली आहे.
घुग्घूसमध्ये ‘मुख्याधिकारी हटाओ, घुग्घूस बचाव’चा नारा
घुग्घूस नगरपरिषदेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आणि मनमानी कारभाराचे थेट आरोप केले आहेत. “शहराच्या विकासासाठी आलेला जवळपास १ कोटी रुपयांचा निधी मुख्याधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक वापरला नाही. पाठपुरावा न करता वेळकाढूपणा केल्यामुळे हा निधी परत गेला,” असा संताप लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.
नगराध्यक्षा दीप्ती सोनटक्के, बांधकाम सभापती रोशन पचारे आणि आरोग्य सभापती नुरुल सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. नगराध्यक्ष व कमिटीला विश्वासात न घेता, अधिकाराबाहेर जाऊन कामे करणे आणि शहराला विकासापासून वंचित ठेवणे, या तक्रारीसह ‘मुख्याधिकारी हटाओ, घुग्घूस बचाव’ अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
कोरपना नगर पंचायतीतही प्रचंड संताप
दुसरीकडे, केवळ एक महिन्यापूर्वी कोरपना नगर पंचायतीचा प्रभारी पदभार स्वीकारलेल्या रांजनकर यांनी तिथेही वादाचा पेरा केला आहे. विकासकामांकडे दुर्लक्ष करणे, नागरिकांची कामे वेळेवर न करणे आणि विचारलेल्या माहितीला बगल देणे, अशा प्रकारांमुळे त्रस्त झालेल्या नगराध्यक्षा नंदाताई विजय बावणे व सदस्यांनी मुख्याधिकारी बदलण्याची मागणी लावून धरली आहे.
जनतेच्या करातून लाखो रुपये वेतन घेणारा अधिकारी जर जनतेचीच कामे अडवून धरत असेल, तर त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या या संयुक्त शिष्टमंडळात नगरसेविका अर्चना प्रशांत सारोकर, पल्लवी दिनेश घुले, स्वीकृत नगरसेवक तौफिक शेख, रोशन दंतलवार, अजहर शेख यांच्यासह
दोन्ही नगरपरिषदांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता जिल्हाधिकारी या वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




