Home Breaking News आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरुष व महिला वॉलीबॉल संघाचा किट व...

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरुष व महिला वॉलीबॉल संघाचा किट व घड्याळ देऊन गौरव

128

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरुष व महिला वॉलीबॉल संघाचा किट व घड्याळ देऊन गौरव

सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या बल्लारपूर येथील भव्य व्हॉलीबॉल मैदानावर चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय ट्रायल्सचे आयोजन करण्यात आले.

या ट्रायल्समधून निवड झालेल्या पुरुष व महिला खेळाडूंना किट उपलब्ध करून देण्याची इच्छा चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद आहुते यांनी व्यक्त केली होती. यासंदर्भात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील बांधकाम, कामगार समितीचे सहअध्यक्ष तथा भाजपचे माजी शहराध्यक्ष डॉ. काशीनाथ सिंह यांनी पुढाकार घेत आमदार मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली.

अल्पावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करत, खेळाडूंच्या जर्सीवरील नंबर व प्रिंटिंगची आवश्यक तयारी करून पुरुष व महिला दोन्ही संघांसाठी आकर्षक किट व घड्याळांची व्यवस्था करण्यात आली. हे किट आज आमदार मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या हस्ते खेळाडूंना प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी आमदार मुनगंटीवार यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक आशिर्वाद दिले. तसेच पुढील काळातही आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ते नागपूरकडे रवाना झाले.

या कार्यक्रमास चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव सुनील आखाडे, राजीव चौधरी, विलास खांडरे, प्रकाश मसके आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष प्रमोद आहुते वैयक्तिक कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत.

किट व घड्याळ मिळाल्यानंतर पुरुष व महिला दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. सर्व उपस्थितांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक आभार मानले तसेच डॉ. काशीनाथ सिंह यांच्या तत्परतेचेही विशेष कौतुक केले, ज्यांच्या पुढाकारामुळे अल्पावधीत हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकला.