“शैक्षणिक विकास आणि जनसेवा शेवटच्या श्वासापर्यंत करू” – माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज
राजे धर्मराव विद्यालय, सिरोंचा येथे पालक संपर्क मेळावा उत्साहात संपन्न
सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)
सिरोंचा : येथील राजे धर्मराव विद्यालयात पालक संपर्क मेळावा व विद्यार्थी संवाद कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. याच कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक रमणजी कोम्मेरा यांच्या सत्कार सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षस्थान अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून कुमार अवधेशराव बाबा आत्राम उपस्थित होते. तसेच प्राचार्य गणेश तगरे, माजी शिक्षक, माजी मुख्याध्यापक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी राजे साहेबांचे उत्साहात स्वागत केले.
पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजे अम्ब्रीशराव महाराज म्हणाले,
“धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना कै. श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती आणि सामाजिक सेवा घडवून आणण्यासाठी केली. त्यानंतर कै. श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांनी या कार्याचा विस्तार केला. आम्हीही शैक्षणिक विकास आणि जनसेवा हा महामंत्र आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जोपासत राहू.”
पुढे ते म्हणाले की, राजे धर्मराव विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश तगरे यांच्या नियोजन, शिस्त व प्रामाणिकतेमुळे शाळेची प्रगती सातत्याने होत आहे. पालकांनी शाळेवरील विश्वास कायम ठेवावा तसेच कोणतीही अडचण असल्यास थेट मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, तिचे निराकरण निश्चित केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक रमणजी कोम्मेरा यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य गणेश तगरे यांनी केले.
या कार्यक्रमास पालक, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







