डॉ. गिरीष गांधी यांचा माजी. खा.नरेश पुगलिया यांच्या हस्ते सत्कार; विदर्भ साहित्य संघाच्या प्रगतीबाबत व्यक्त विश्वास
सुवर्ण भारत : शंकर महाकाली
चंद्रपूर : विदर्भाच्या साहित्य क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या निवडणुकीत विजय मिळवत विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या डॉ. गिरीष गांधी यांचा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
डॉ. गांधी यांनी पुगलिया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता, पुगलिया यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी त्यांनी डॉ. गांधी यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ साहित्य संघाची प्रगती अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी नागपूर येथून आलेले विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी यांच्यासह प्रकाश ईटनकर व श्रीराम काळे यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे जिल्हा महासचिव अशोक नागापूरे, शहराध्यक्ष देवेंद्र बेले, चंद्रशेखर पोडे, पंकज गुप्ता, कामगार संघटनेचे शिवचंद्र काळे व देवेंद्र गहलोत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या भेटीत साहित्य, समाजकारण आणि विदर्भाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. डॉ. गिरीष गांधी यांच्या नेतृत्वाखाली संघ अधिक सक्षमपणे कार्यरत राहील, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.







