घुग्घूस : लोखंडी पूल 30 जुलैपर्यंत पूर्ण करा — नगराध्यक्षा दिप्तीताई सोनटक्के यांचा प्रशासनाला इशारा
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी ,चंद्रपूर
घुग्घूस — शहरातील वेकोली व वस्ती भागाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा लोखंडी पूल गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा अभाव असल्याने अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त करत नगराध्यक्षा दिप्तीताई सोनटक्के यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे.
चंद्रपूर येथील नियोजन भवनात दि. 15 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत हा प्रश्न ठळकपणे उपस्थित करण्यात आला. या बैठकीस खासदार, आमदार, जिल्हाधिकारी व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा सोनटक्के तसेच स्वच्छता व आरोग्य सभापती नुरूल सिद्दीकी यांनी पुलाचे दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्याची जोरदार मागणी केली.
या मागणीची दखल घेत प्रशासनाने लोखंडी पुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करून 30 जुलै 2026 पर्यंत वाहतुकीसाठी सुरू करण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्षा सोनटक्के यांनीही याबाबत स्पष्ट इशारा देत, “निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असे ठामपणे सांगितले.
दरम्यान, बैठकीत घुग्घूस शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवरही चर्चा झाली. यावेळी नगराध्यक्षा सोनटक्के यांनी प्रशासनाची कानउघाडणी करत प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी लवकरच विशेष सुनावणी आयोजित करून प्रभावी अंमलबजावणी केली जाईल व प्रदूषण नियंत्रणाचा प्रश्न गांभीर्याने हाताळला जाईल, असे आश्वासन दिले.
शहरातील नागरिक आता प्रशासनाच्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे लक्ष ठेवून आहेत. तीन वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला गती मिळेल का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.







