घुग्घूसच्या गायत्री दांडवे यांची जिद्दीला यशाची किनार; महाराष्ट्र पोलीस दलात निवड, गडचिरोलीत नियुक्ती
महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार ने हार्दिक अभिनंदन
सुवर्ण भारत:शंकर महाकाली
चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्घूस येथील कु. गायत्री रविंद्र दांडवे हिने महाराष्ट्र पोलीस दलात निवड मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची नियुक्ती गडचिरोली या नक्षलग्रस्त व संवेदनशील विभागात करण्यात आली असून, या यशामुळे घुग्घूस परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अत्यंत साध्या कुटुंबातून पुढे येत, जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर गायत्रीने हे यश मिळवले आहे. पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे तिचे स्वप्न आता साकार झाले आहे. गडचिरोलीसारख्या आव्हानात्मक भागात सेवा देण्याची संधी मिळणे ही मोठी जबाबदारी असून, ती आपल्या कर्तव्यनिष्ठा व धैर्याच्या बळावर निश्चितच आपला ठसा उमटवेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या यशाबद्दल आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी गायत्री व तिच्या कुटुंबाचे अभिनंदन केले. “घुग्घूससारख्या भागातून पुढे येत मिळवलेले हे यश इतर तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी आहे. गायत्रीचा हा प्रवास समाजासाठी दिशादर्शक ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष संजय भाऊ तिवारी, गणेश शेंडे, मुन्ना लोडे, बंडू रामटेके, अजय गोहणे, साजन गोहणे, संतोष जूनघरी, विकास पानघाटे, महेंद्र बाग यांसह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, गायत्री दांडवे हिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.







