
लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मृदा परीक्षणाचे मार्गदर्शन
लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे शेतकऱ्यांसाठी मृदा परीक्षण विषयक प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा येथे उत्साहात संपन्न झाली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक व वैज्ञानिक शेती पद्धतींचे ज्ञान मिळावे तसेच शेती उत्पादन वाढीसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये प्रमुख प्रशिक्षक म्हणून वरिष्ठ अधिकारी डॉ. महेंद्र वैरागडे यांनी मृदा परीक्षणाचे महत्त्व, त्याची गरज व शेती उत्पादन वाढीसाठी त्याचे योगदान यावर सखोल व मार्गदर्शक माहिती दिली. त्यानंतर व्यवस्थापक डॉ. आदित्य कदम यांनी शेतकऱ्यांना पुढील तांत्रिक मार्गदर्शन करत आधुनिक शेतीतील मृदा व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. महेश उपरे, मानस मकासरे, गजानन बोबडे, अभिजित चौधरी व आदित्य मोहितकर, यांनी सहकार्य केले.
प्रशिक्षणादरम्यान मृदा परीक्षणाचे वैज्ञानिक महत्त्व, जमिनीची सुपीकता ओळखणे, पोषक तत्त्वांचे प्रमाण निश्चित करणे आणि त्यानुसार पिकनिहाय नियोजन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच मातीचे नमुने योग्य पद्धतीने कसे घ्यावेत याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. यामध्ये नागमोडी पद्धतीने शेतातील विविध ठिकाणांहून नमुने घेणे, १५ ते २० सेमी खोलीपर्यंत माती संकलन करणे, नमुन्यांची योग्य साठवणूक व प्रयोगशाळेत पाठवण्यापूर्वीची तयारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मातीतील pH, सेंद्रिय कार्बन, नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे विश्लेषण कसे केले जाते व त्यावरून जमिनीची सुपीकता कशी ठरवली जाते हे समजावून सांगण्यात आले. मृदा परीक्षण अहवाल कसा वाचावा, त्यानुसार योग्य खत व्यवस्थापन कसे करावे यावरही भर देण्यात आला.
याशिवाय सेंद्रिय शेती पद्धती, गांडूळ खत, हरितखत, पीक फेरपालट तसेच जमिनीची संरचना व आर्द्रता टिकवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये बेलसणी, मुरसा, पांढरकवडा, वढा व शेणगाव येथील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरल्याचे सांगत अशा उपक्रमांमुळे आधुनिक शेतीकडे वाटचाल सुलभ होत असल्याचे मत व्यक्त केले.






