घुग्घुसमध्ये पंचशील बौद्ध विहाराचे लोकार्पण; तथागत बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना उत्साहात
सुवर्ण भारत : पंकज रामटेके, सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर (घुग्घुस) : भारतीय बौद्ध महासभा शाखा घुग्घुस यांच्या वतीने नवनिर्मित पंचशील बौद्ध विहाराचे लोकार्पण तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमांतर्गत मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीच्या भव्य मिरवणुकीने झाली. तिलक नगर, अमराई लुंबिनी वन बौद्ध विहार, आम्रपाली बौद्ध विहार, पोळा मैदान, गांधी चौक, बँक ऑफ इंडिया परिसर आदी मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. विविध ठिकाणी पुष्पवर्षाव करून मूर्तीचे स्वागत करण्यात आले. त्रिशरण व पंचशील ग्रहण करत मिरवणूक नगर परिषद मार्गे पंचशील बौद्ध विहार येथे समारोप करण्यात आली.
यानंतर मान्यवर उद्घाटक कवडुजी लटारू रामटेके यांच्या हस्ते फीत कापून विहाराचे लोकार्पण व नामफलकाचे अनावरण करण्यात आले. बुद्धमूर्तीचे दानदाते अशोक सुखदेव पाझारे यांच्या हस्ते बौद्धाचार्य कृष्णांक पेरकावार, भंते महात्तीस (नागपूर) व भिक्खु रत्नमणी थेरो (घुग्घुस) यांच्या उपस्थितीत मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वज फडकविण्यात आला. सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण कार्यक्रमात मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले.
**लोकवर्गणीतून उभारलेला विहार**
विशेष म्हणजे हा पंचशील बौद्ध विहार पूर्णतः लोकवर्गणीतून उभारण्यात आला असून कोणत्याही राजकीय नेते, उद्योगसमूह किंवा शासनाच्या निधीचा वापर करण्यात आलेला नाही. शाखाध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या जिद्दीमुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. बांधकामासाठी कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे, सल्लागार बबन वाघमारे व विजय कवाडे यांनी मोलाचे योगदान दिले.
सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.
**दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम**
दुसऱ्या दिवशी, १५ एप्रिल रोजी महात्मा फुले वंशज आयु. निताताई रमाकांत होले (पुणे), दौलतराव धेंडे, अॅड. जान्हवीताई धेंडे, सचिन आगरवाल व इंजि. नेताजी भरणे यांचे मार्गदर्शन लाभले. यानिमित्त भोजनदान तसेच भीमगीतांचा जलसा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गायिका जयश्रीताई लोखंडे यांनी सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.
३ मे २०१८ रोजी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुरेशभाऊ पाईकराव यांनी विहार उभारणीस सुरुवात केली होती. कोविड-१९ महामारी व आरोग्याच्या अडचणींमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास सुमारे आठ वर्षांचा कालावधी लागला.
कार्यक्रमात समाजकार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास उपाध्यक्ष शरद पाईकराव, जिल्हाध्यक्ष किशोर तेलतुंबडे, गुरुबालक मेश्राम, सपनाताई कुंभारे, कविताताई चांदेकर, मायाताई सांड्रावार तसेच यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा रिताताई देशकर, प्रतिमाताई कांबळे यांच्यासह पदाधिकारी व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्णतः लोकवर्गणीतून उभारलेला हा पंचशील बौद्ध विहार घुग्घुस शहरासाठी ऐतिहासिक ठरत असून सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून ओळखला जात आहे.







