Home Breaking News • कोल वॉशरीज प्रदूषणावर कठोर कारवाईचा इशारा • पर्यावरण मंत्री पंकजा...

• कोल वॉशरीज प्रदूषणावर कठोर कारवाईचा इशारा • पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची बेलसनीत पाहणी; शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन

9
Oplus_131072

• कोल वॉशरीज प्रदूषणावर कठोर कारवाईचा इशारा

• पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची बेलसनीत पाहणी; शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन

सुवर्ण भारत : शंकर महाकाली

चंद्रपूर : तालुक्यातील बेलसनी परिसरात कोल वॉशरीजमुळे वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोल वॉशरीजवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देत प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.

महामाया कोल वॉशरीजमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या कापूस पिकांवर मोठ्या प्रमाणात काळ्या धुळीचा थर साचून नुकसान झाल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून कृषी, महसूल व प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे ६० ते ६५ टक्के नुकसान नोंदवण्यात आले असून, त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत हा प्रश्न प्रभावीपणे मांडत शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत पाहणी दौरा आयोजित केला. शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळावा आणि नुकसानभरपाई लवकर देण्यात यावी, यासाठी प्रशासनाने गतीने काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.

पाहणीदरम्यान पंकजा मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, सध्याची स्वच्छता ही तात्पुरती नसून कायमस्वरूपी उपाययोजना दिसून आली पाहिजे. पुढील भेटीत प्रदूषणात लक्षणीय घट झालेली दिसली पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी दिली.

या पाहणीमुळे बेलसनी परिसरातील प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.