• इरई–झरपट नद्यांच्या पुनर्जीवनासाठी ठोस आराखड्याची मागणी
• माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांचे मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन
सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)
चंद्रपूर : १६ एप्रिल चंद्रपूरमधील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर इरई व झरपट नद्यांच्या कायमस्वरूपी पुनर्जीवनासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली. त्यांच्या दौऱ्यात विसापूर येथील बॉटनिकल गार्डनमध्ये विदर्भ मजदुर काँग्रेसचे शहर अध्यक्ष देवेंद्र बेले जिल्हा महासचिव अशोक नागपुरे, पंकज गुप्ता यांनी निवेदन दिले.
निवेदनात इरई व झरपट नद्या या शहराच्या जीवनवाहिन्या असून पाणीपुरवठा, शेती आणि पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र सध्या गाळ साचणे, जलवनस्पतींची वाढ आणि प्रदूषणामुळे त्यांची अवस्था गंभीर झाली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावत असून पूरस्थितीचाही धोका वाढला आहे.
तसेच Western Coalfields Limited कडून टाकले जाणारे ओव्हरबर्डन व सीटीपीएसमधील राखेमुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह अडथळला जात असल्याचेही निदर्शनास आणले. न्यायालयाच्या निर्देशांनंतरही उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
नाग नदी प्रकल्पाच्या धर्तीवर सर्वसमावेशक आराखडा राबवून खोलीकरण, संरक्षण भिंती, लहान बंधारे आणि निधीचा प्रभावी वापर करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.





