
विदर्भात सूर्याचा कहर; उष्णतेने कामगार हैराण, उपाययोजनांची मागणी तीव्र
सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
विदर्भात दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असून सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. चंद्रपूरसह अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून उष्णतेची लाट अधिक तीव्र होत चालली आहे. अवकाळी पावसानंतर वातावरणातील आर्द्रता कमी होताच पाऱ्याने झपाट्याने उसळी घेतली आहे.
दुपारच्या सुमारास उष्णतेची तीव्रता इतकी वाढते की १२ ते ४ या वेळेत रस्ते निर्मनुष्य होत आहेत. बाजारपेठांमध्येही शांतता पसरत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. या उकाड्याचा सर्वाधिक फटका औद्योगिक परिसरातील कामगारांना बसत आहे. अनेक कंपन्यांमध्ये पुरेशा थंड पाण्याची, कुलर किंवा विश्रांतीची व्यवस्था नसल्याने कामगार त्रस्त झाले आहेत.
भारतीय हवामान विभागाने १८ ते २३ एप्रिलदरम्यान विदर्भात तीव्र उष्णतेची लाट येण्याचा इशारा देत ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. काही भागांत तापमान ४५ ते ४६ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, औद्योगिक भागातील कामगारांनी दुपारच्या विश्रांतीची वेळ वाढवण्याची मागणी पुढे केली आहे. सध्या केवळ एक तास असलेली जेवणाची सुट्टी किमान तीन तासांपर्यंत वाढवावी, तसेच कामाच्या ठिकाणी थंड पाणी, कुलर, सावलीची व्यवस्था करावी, अशी मागणी कामगारांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर कंपन्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
उष्णतेची सद्यस्थिती:
विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर येथे तापमान ४० ते ४५ अंशांच्या दरम्यान असून उष्णतेची तीव्र लाट कायम आहे.
नागरिकांसाठी खबरदारी:
• दुपारी १२ ते ४ दरम्यान बाहेर पडणे टाळावे,
• भरपूर पाणी, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी सेवन करावे
• सुती व हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत
• लहान मुले, वृद्ध व आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी
उष्णतेचा वाढता प्रकोप लक्षात घेता प्रशासन आणि उद्योगांनी समन्वय साधून कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.




