Home Breaking News लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम : बेलसनीत विकासकामांचे लोकार्पण उत्साहात

लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम : बेलसनीत विकासकामांचे लोकार्पण उत्साहात

21
Oplus_131072

लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम : बेलसनीत विकासकामांचे लोकार्पण उत्साहात

सुवर्ण भारत | पंकज रामटेके, सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर :  जिल्ह्यातील बेलसनी गावात लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनच्या सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी चालना मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

फाऊंडेशनतर्फे ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधा या क्षेत्रांवर विशेष भर देत सातत्याने काम केले जात आहे. त्याच अनुषंगाने बेलसनी येथे महत्त्वपूर्ण प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात आली असून, गावाच्या प्रगतीसाठी हा टप्पा निर्णायक ठरणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

या उपक्रमांतर्गत ‘लॉयड्स कम्युनिटी क्लिनिक’च्या माध्यमातून मोफत दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्यसेवा विनामूल्य उपलब्ध होणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद शाळेत डिजिटल स्मार्ट बोर्ड, संगणक प्रयोगशाळा (कॉम्प्युटर लॅब) व सीसीटीव्ही कॅमेरे बसवून विद्यार्थ्यांना आधुनिक व तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी बोअरवेल व संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्यात आली आहे. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागणार असून, स्वच्छतेतही सुधारणा होणार आहे.

समारंभाचे उद्घाटन लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे जनरल मॅनेजर विकास वर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक महाप्रबंधक डॉ. विद्या पाल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सरपंच सौ. इंदिराताई पोळे, मुख्याध्यापक कुंदा खामणकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी फाऊंडेशनच्या उपक्रमांचे कौतुक करत ग्रामीण विकासासाठी अशा प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. डिजिटल शिक्षण व मोफत आरोग्यसेवा या सुविधांमुळे विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत फाऊंडेशनचे आभार मानले. या उपक्रमांमुळे बेलसनीच्या विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत भविष्यातही अशाच उपक्रमांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.