Home Breaking News इरई-झरपट नदी पुनर्जीवनासाठीच्या निबंध स्पर्धेचा उत्साहात समारोप; नरेशबाबू पुगलिया यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन...

इरई-झरपट नदी पुनर्जीवनासाठीच्या निबंध स्पर्धेचा उत्साहात समारोप; नरेशबाबू पुगलिया यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन व राहुलबाबू पुगलिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण

92
Oplus_131072

Oplus_131072

इरई-झरपट नदी पुनर्जीवनासाठीच्या निबंध स्पर्धेचा उत्साहात समारोप

माजी. खा.नरेशबाबू पुगलिया यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन व राहुलबाबू पुगलिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण

सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर : २२ एप्रिल रोजी चंद्रपूरच्या जीवनवाहिनी ठरलेल्या इरई व झरपट नद्यांच्या पुनर्जीवनासाठी जनजागृतीचा नवा धागा जोडणारा निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पृथ्वी दिनाचे औचित्य साधत इंदिरा गांधी गार्डन स्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते राहुलबाबू पुगलिया यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. शहराच्या संस्कृती, परंपरा आणि विकासाशी नाळ जुळलेल्या इरई व झरपट नद्यांच्या पुनर्जीवनाची गरज अधोरेखित करत या उपक्रमातून पर्यावरणाबद्दलची जाणीव अधिक दृढ करण्यात आली.

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र आणि ग्रीन प्लॅनेट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ एप्रिल रोजी आयोजित खुल्या निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. नद्यांबद्दलची आस्था, संवेदनशीलता आणि जबाबदारी लेखणीतून व्यक्त करत सहभागींच्या विचारांना या स्पर्धेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

बक्षीस वितरण सोहळ्यात कु. कृतिका प्रविण पानघाटे यांनी प्रथम क्रमांक पटकावत १५ हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मिळविले. द्वितीय क्रमांक कु. सिद्धी सुनील पारशिवे (१० हजार रुपये) तर तृतीय क्रमांक सारस व्ही. फुलझले (५ हजार रुपये) यांनी मिळविला. सर्व विजेत्यांचा टाळ्यांच्या कडकडाटात गौरव करण्यात आला. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली.

यावेळी बोलताना राहुलबाबू पुगलिया यांनी, “नदी वाचवा, पर्यावरण वाचवा हा संदेश प्रत्येकाच्या कृतीत उतरला पाहिजे,” असे आवाहन करत या उपक्रमातून एक सशक्त जनचळवळ उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमात ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे लिखित इरई नदीवरील पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी योगेश दुधपचारे, प्राचार्या सिमा जोसेफ, देवेंद्र बेले, कृष्णन नायर, व्ही. कुमार, मजहर अली, प्रकाश वडगांवकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.