लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनकडून घुग्घूस नगरपरिषद क्षेत्रात पाणी टँकरचे लोकार्पण; पाणीपुरवठा उपक्रमाला सुरुवात
घुग्घूस : उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे घुग्घूस नगरपरिष
द क्षेत्रात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनच्या पुढाकारातून पाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाची औपचारिक सुरुवात पाणी टँकरच्या लोकार्पण सोहळ्याने करण्यात आली.
या लोकार्पण कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पाणी टँकरचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले. यानंतर तात्काळ नागरिकांसाठी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत दररोज ४ पाणी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. प्रत्येक टँकरकडून दररोज ५ फेऱ्या (ट्रिप) मारण्यात येणार असून, एकूण २० फेऱ्यांद्वारे शहरातील विविध भागांमध्ये पाणी पोहोचवले जाणार आहे.
विशेषतः ज्या भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे, त्या भागांना प्राधान्य देऊन पाणी वितरण करण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून नियोजनबद्ध पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे, ज्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये हा यामागील मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाच्या वेळी लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनचे सहाय्यक महाप्रबंधक डॉ. विध्या पाल, सहाय्यक महाप्रबंधक तरुण केशवानी, घुग्घूस नगरपरिषद उपनगराध्यक्ष श्री. राजू रेड्डी, आरोग्य सभापती श्री. नरुल सिद्दीकी, नगरसेविका पल्लवी धुळे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत, नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.
लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येत असलेला हा पाणीपुरवठा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत असून, भविष्यातही अशा प्रकारचे लोकहिताचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


