वर्धा नदीच्या त्रिवेणी संगमावर थरार; एकाच कुटुंबातील तिघेजण बुडाले
सुवर्ण भारत : पंकज रामटेके
घुग्घूस : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस नजीकच्या धानोरा येथील वर्धा नदीच्या त्रिवेणी संगमावर आज मंगळवारी सकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या मामाला वाचवण्याच्या नादात भाची आणि मुलीचाही बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत राजू हरिश्चंद्र कोडापे (४०), अर्पिता राजू कोडापे (१२, दोन्ही रा. खामोना, ता. राजुरा) आणि प्रियंका शामराव मडावी (१४, रा. धानोरा, ता. चंद्रपूर) हे तिघेही खोल पाण्यात बेपत्ता झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील खामोना येथील रहिवासी राजू कोडापे हे आपली मुलगी अर्पितासह धानोरा येथे आपल्या बहिणीच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. आज दि. २८ एप्रिल रोजी सकाळी १०:३० ते ११:०० वाजताच्या सुमारास कुटुंबातील काही सदस्य कपडे धुण्यासाठी वर्धा नदीच्या काठावर गेले होते. यावेळी राजू कोडापे हे नदीपात्रात स्नान करण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल डहात ओढले गेले आणि गटांगळ्या खाऊ लागले.
राजू कोडापे यांना पाण्यात बुडताना पाहून काठावर उभ्या असलेल्या त्यांच्या मुलीने (अर्पिता) आणि भाचीने (प्रियंका) क्षणाचाही विचार न करता त्यांना वाचवण्यासाठी नदीत उड्या घेतल्या. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असल्याने या दोघींनाही स्वतःवर नियंत्रण मिळवता आले नाही. पाहता पाहता तिघेही जण डोळ्यादेखत अथांग पाण्यात दिसेनासे झाले.
नदीकाठी असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच घुग्घूस पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. सध्या स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांच्या मदतीने बोटीद्वारे नदीपात्रात शोधमोहीम राबवली जात आहे. वृत्त लिहेपर्यंत अद्याप कोणाचाही पत्ता लागलेला नव्हता. या घटनेमुळे खामोना आणि धानोरा या दोन्ही गावांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.







