टेंमुर्डा येथे घरफोडी; बंद घराचा कुलूप तोडून ३३ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
सुवर्ण भारत : खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी वरोरा

वरोरा : वरोरा तालुक्यातील टेंमुर्डा येथे अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सुमारे ३३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. शितल रामप्रसाद हरद (वय ३०, रा. टेंमुर्डा, ता. वरोरा) या आपल्या मुलांसह टेंमुर्डा येथे वास्तव्यास असून घरकाम करून उदरनिर्वाह करतात. शाळेला सुट्ट्या असल्यामुळे त्या २० मे २०२६ रोजी आपल्या माहेरी पिंपळगाव येथे गेल्या होत्या.
दरम्यान, त्यांचे वडील लक्ष्मण जिवतोडे हे रात्री टेंमुर्डा येथील घरी झोपण्यासाठी जात असत. ९ जूनच्या रात्री ते नेहमीप्रमाणे टेंमुर्डा येथे गेले होते. १० जून रोजी सकाळी सुमारे ६ वाजता घराला कुलूप लावून ते पिंपळगाव येथे परतले.
दुपारी सुमारे २.३० वाजताच्या सुमारास घराशेजारी राहणाऱ्या महिलेने फोन करून घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. व्हिडिओ कॉलद्वारे घराची पाहणी केली असता कपाट उघडे असल्याचे दिसून आले. त्यानंतर फिर्यादी तातडीने टेंमुर्डा येथे पोहोचल्या असता घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले आढळले.
घरातील लोखंडी कपाटाची तपासणी केली असता लॉकरमधील दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे कानातील दागिने, सोन्याचे पदक असलेले मंगळसूत्र तसेच दुसरे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण अंदाजे ३३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दत्ताहरी सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
