Home Breaking News विज्ञानाची ओढ अन् भक्तीचा ध्यास: नागपूरच्या दिशा ठाकरेंचा यशोप्रवास

विज्ञानाची ओढ अन् भक्तीचा ध्यास: नागपूरच्या दिशा ठाकरेंचा यशोप्रवास

13
Oplus_131072

विज्ञानाची ओढ अन् भक्तीचा ध्यास: नागपूरच्या दिशा ठाकरेंचा यशोप्रवास

सुवर्ण भारत :  किरण घाटे ( विदर्भ विशेष प्रतिनिधी )

कर्तव्यदक्ष पित्याचे संस्कार, मायेची सावली देणारी माता आणि ध्येयाने भारलेले मन यांचा त्रिवेणी संगम म्हणजे नागपूरच्या मातीतील एक उमलतं व्यक्तिमत्व – दिशा विजय ठाकरे. भारतीय सैन्यदलातील (CRPF) वडील विजय देवजी ठाकरे यांच्या शिस्तीत आणि आई कुंदाताई यांच्या वात्सल्यात दिशा यांचे बालपण झारखंडच्या निसर्गरम्य परिसरात बहरले. सैनिकाच्या लेकीला परिस्थितीशी जुळवून घेण्याचे बाळकडू घरातूनच मिळाले, त्यामुळेच झारखंड ते नागपूर असा त्यांचा शैक्षणिक प्रवास एखाद्या झऱ्याप्रमाणे प्रवाही राहिला.

दिशा यांच्या शैक्षणिक प्रवासाकडे नजर टाकल्यास प्रगतीचा एक चढता आलेख स्पष्टपणे दिसून येतो. १० वीत ८० टक्क्यांपासून सुरू झालेला हा प्रवास १२ वीत ६९ टक्के, तर विज्ञानाच्या कठीण वाटेवर चालताना बी.एस्सी. मध्ये ८६ टक्के आणि एम.एस्सी. (भौतिकशास्त्र) मध्ये तब्बल ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचला. ‘शून्यातून विश्व निर्माण करणे’ या उक्तीप्रमाणे दिशा यांनी प्रत्येक टप्प्यावर स्वत:ला सिद्ध केले. उच्च शिक्षणाचे शिखर सर करताना त्यांनी केवळ गुणांची टक्केवारीच वाढवली नाही, तर ज्ञानाची कक्षाही तितकीच रुंदावली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून भौतिकशास्त्रात मिळवलेले प्राविण्य त्यांच्या बुद्धिमत्तेची साक्ष देते.

केवळ विज्ञानाचा आणि आकड्यांचा विचार न करता, दिशा यांनी आध्यात्मिक मार्गाचीही कास धरली आहे. एकीकडे भौतिकशास्त्रातील ‘न्यूटन’ आणि ‘आईन्स्टाईन’ यांचे सिद्धांत अभ्यासणारी ही कन्या, दुसरीकडे कीर्तनकार होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ‘भक्तीच्या वाटेवर’ मार्गक्रमण करत आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी ही आधुनिक सावित्री आजच्या पिढीसाठी एक आदर्श आहे. त्यांच्या याच धार्मिक वृत्तीची आणि अभ्यासू वृत्तीची दखल घेऊन तैलिक समाजाच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला, जो त्यांच्या कर्तृत्वाचा खऱ्या अर्थाने गौरव ठरला.

दिशा यांच्या यशाचे रहस्य त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीत दडलेले आहे. अभ्यासाची गोडी, घरकामात आईला देलेला मदतीचा हात आणि आजी कौशल्याबाईंचे लाभलेले आशीर्वाद यांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व अधिकच निखरले आहे. प्रगतीचा हा आलेख मांडताना दिशा यांच्या मनात कृतज्ञतेची भावना ओतप्रोत भरलेली आहे. मायाताई कोसरे आणि अधिवक्ता मेघा धोटे यांच्या मार्गदर्शनाने त्यांना नवी दृष्टी दिली, तर रंजू मोडक आणि नलिनी आडपवार यांच्या स्नेहाने त्यांना आत्मबळ दिले. आपल्या चुकांचा स्वीकार करण्याची प्रामाणिकता आणि भविष्यात अधिक चांगले करण्याची जिद्द दिशा यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते. अशा या बहुआयामी आणि तेजस्वी रत्न असलेल्या दिशा ठाकरे यांचा प्रवास उत्तरोत्तर अधिक दैदीप्यमान होईल, यात शंका नाही.