Home Breaking News झाडीपट्टी नाट्य रंगभूमीचा अष्टपैलू हिरा: अभिनेत्री टीना उराडे

झाडीपट्टी नाट्य रंगभूमीचा अष्टपैलू हिरा: अभिनेत्री टीना उराडे

11
Oplus_131072

झाडीपट्टी नाट्य रंगभूमीचा अष्टपैलू हिरा: अभिनेत्री टीना उराडे

सुवर्ण भारत: किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर -कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती समाजप्रबोधनाचा एक सशक्त आरसा आहे, हे आपल्या अभिनय कौशल्याने सिद्ध करणाऱ्या चंद्रपूरच्या सुप्रसिद्ध नाट्य कलावंत म्हणजेच टीना यशवंत उराडे. मागील नऊ वर्षांपासून झाडीपट्टीच्या समृद्ध रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा अविरत ठसा उमटवणाऱ्या टीना यांनी आजवर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नाटकापासून ते ऐतिहासिक, लावणीप्रधान आणि सामाजिक नाटकांपर्यंत तब्बल १०० ते १५० प्रयोगांचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले आहे. आई, बहीण, मुलगी, पत्नी, सून, सासू आणि प्रेयसी अशा एकापेक्षा एक वैविध्यपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिका साकारत त्यांनी प्रत्येक पात्राला जिवंत केले आहे. वर्षाकाठी शंभरपेक्षा अधिक प्रयोगांचे सातत्य राखत त्यांनी आपले एक वेगळे आणि स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.
टीना यांच्या या प्रवासाची सुरुवात अत्यंत रंजक आहे. ‘खेळ मांडला संसाराचा’ या छोट्याशा मालिकेच्या माध्यमातून त्यांनी अभिनयाचे प्राथमिक धडे गिरवले आणि खेडोपाड्यात जाऊन आपल्या कलेचा दर्जा उंचावला. याच दरम्यान एका तबलावादक सुहृदाने त्यांच्यातील उपजत कला ओळखून त्यांना झाडीपट्टी रंगभूमीची वाट दाखवली. “तुझ्यासारख्या दर्जेदार कलावंताची झाडीपट्टीला गरज आहे,” या शब्दांनी त्यांना हुरूप दिला आणि त्यांनी झाडीपट्टीत पाऊल ठेवले. आज नऊ वर्षांनंतर मागे वळून पाहताना, कला आणि संस्कृतीचा हा समृद्ध वारसा जपायला मिळाल्याचा सार्थ अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो.नाटकाच्या माध्यमातून केवळ आर्थिक स्थैर्यच नव्हे, तर सर्वोच्च मानसिक समाधान लाभते, अशी प्रांजळ कबुली टीना उराडे देतात. अभिनयाच्या या प्रवासात त्यांना त्यांच्या मातोश्री सारिका यशवंत उराडे (संस्थापक अध्यक्ष: सर्वांगीण विकास बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ तथा अखिल भारतीय लोककलावंत सांस्कृतिक समिती, चंद्रपूर) यांचे मोलाचे पाठबळ लाभले. केवळ अभिनय न करता रंगभूमीच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती आणि व्यसनमुक्तीचा संदेश घराघरांत पोहोचवण्याचे पवित्र कार्य त्यांनी केले आहे. आपल्या या यशाचे श्रेय आणि कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी ‘सहज सुचलं’ समूह आणि जेष्ठांचे मनापासून आभार मानले आहेत. रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारी ही अष्टपैलू अभिनेत्री आगामी काळातही आपल्या कलेने समाजमनाला अशीच साद घालत राहील, यात मुळीच शंका नाही.