Home Breaking News कर्तृत्ववान समाजसेविका रंज्जू दिलीप मोडक: ‘सहज सुचलं’ परिवाराचा खंबीर आधारस्तंभ

कर्तृत्ववान समाजसेविका रंज्जू दिलीप मोडक: ‘सहज सुचलं’ परिवाराचा खंबीर आधारस्तंभ

8
Oplus_131072

कर्तृत्ववान समाजसेविका रंज्जू दिलीप मोडक: ‘सहज सुचलं’ परिवाराचा खंबीर आधारस्तंभ

सुवर्ण भारत:किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर : चंद्रपूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक परिचित नाव म्हणजे रंज्जू दिलीप मोडक! गेल्या अनेक वर्षांपासून त्या समाजसेवेचा वसा घेऊन घर आणि समाज अशा दोन्ही आघाड्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. विशेषतः ‘सहज सुचलं’ या महाराष्ट्रातील नामवंत डिजिटल व्यासपीठाच्या मुख्य संयोजिका म्हणून त्या गेल्या चार वर्षांपासून अत्यंत प्रभावीपणे काम पाहत आहेत. त्यांच्या या प्रवासात मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे आणि अधिवक्ता मेघा धोटे यांचा त्यांनी अल्पकाळातच विश्वास संपादन केला, हे त्यांच्या कार्यक्षमतेचेच प्रतीक आहे.

रंज्जू मोडक यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रेमळ आणि शांत असले, तरी कामाच्या बाबतीत त्या तितक्याच शिस्तप्रिय आहेत. पदवीधर असलेल्या मोडक यांनी केवळ पदवीच मिळवली नाही, तर अनुभवाच्या शाळेतूनही बरेच काही आत्मसात केले. ‘सहज सुचलं’ परिवाराची धुरा सांभाळताना त्यांनी कोणावरही टीका न करण्याचे धोरण स्वीकारले आणि आपल्या कामातूनच टीकाकारांना उत्तर दिले. त्यांची ही सकारात्मक वृत्तीच त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेली आहे.

केवळ सहज सुचलं परिवारातच नव्हे, तर आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे आहे. ‘योगनृत्य परिवार’मध्ये महिला उपजिल्हा प्रभारी म्हणून त्या गेल्या सहा वर्षांपासून विनामूल्य सेवा देत आहेत. त्यांच्या योग प्रसाराच्या कार्याची दखल घेत चंद्रपूरचे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त विपीन पालिवाल यांच्या हस्ते त्यांचा गौरवही करण्यात आला आहे. स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून त्यांनी मंदिर परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला, ज्याबद्दल त्यांना महानगरपालिकेचे प्रोत्साहनपर पारितोषिकही मिळाले आहे.

रंज्जू यांच्या कार्याचा परीघ मोठा असून त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मूल येथे जागतिक महिला दिनानिमित्त मिळालेला ‘राष्ट्रीय लोकहित सेवा पुरस्कार’ असो वा वणी येथील ‘शिक्षण दिन’ विशेष सन्मान, प्रत्येक पुरस्कार त्यांच्या निस्वार्थी सेवेची पावती देतो. वैयक्तिक आयुष्यात कठीण प्रसंग असतानाही, विशेषतः त्यांची कन्या प्रख्यात चित्रकार नूपुर मोडक हिच्या आजारपणाच्या काळातही, त्यांनी आपल्या सामाजिक कर्तव्याकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.

स्वतःच्या प्रगतीसोबतच इतर महिलांना पुढे नेण्याची त्यांची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. किरण साळवी, नलिनी आडपवार अशा सखींशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आणि आपल्या टीममधील कलाकारांच्या कौतुकाचा त्यांनी घेतलेला पुढाकार, हे त्यांच्या मोठ्या मनाचे दर्शन घडवते. ब्युटी पार्लर आणि समाजसेवेची आवड जोपासणाऱ्या रंज्जू मोडक आज खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरल्या आहेत. त्यांच्या या प्रवासात ‘सहज सुचलं’ मुळे त्यांना मिळालेली ओळख आणि त्यांनी निर्माण केलेला विश्वास हा आगामी काळातही अनेक महिलांना प्रेरणा देत राहील, यात मुळीच शंका नाही.