Home Breaking News • बल्लारपुरात काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात तीव्र आक्रोश • नगरपालिका चौकात धरणे...

• बल्लारपुरात काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात तीव्र आक्रोश • नगरपालिका चौकात धरणे आंदोलन; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी • तहसीलदारांना निवेदन सादर करून दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी

31

• बल्लारपुरात काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात तीव्र आक्रोश

• नगरपालिका चौकात धरणे आंदोलन; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

• तहसीलदारांना निवेदन सादर करून दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी

सुवर्ण भारत | वैभव मेश्राम
प्रतिनिधी, बल्लारपूर

बल्लारपूर : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या सातत्याने वाढत असलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात बल्लारपूर शहर काँग्रेसच्या वतीने नगरपालिका चौकात जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला. आंदोलनानंतर तहसीलदार रेणुका कोकाटे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

देशात दिवसेंदिवस वाढणारी महागाई, पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडलेले दर आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, छोटे व्यापारी आणि मध्यमवर्गीय कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंचे दरही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. केंद्र सरकारने तातडीने इंधन दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा काँग्रेसच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था सक्षमपणे हाताळली गेली होती. त्या काळात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचे दर नियंत्रणात होते. मात्र, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षांच्या कार्यकाळात इंधनाच्या किमती दुपटीने वाढल्या असून महागाईने उच्चांक गाठला आहे. केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे सामान्य जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल करीम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. अलका अनिल वाढई, ॲड. मेघा भाले, अफसाना सय्यद, गोविंदा उपरे, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, मेहमुद पठाण, रवि मांतगी, नगरसेवक भास्कर माकोडे, माजी नगरसेवक नासिर खान, अनिल खरतड, हेमंत मानकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनानंतर तहसीलदार रेणुका कोकाटे यांना निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती तातडीने कमी कराव्यात, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात तसेच सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, आंदोलनामुळे नगरपालिका चौक परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे परिसरात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते.