जिजामाता वॉर्डात सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरची गळफास घेऊन आत्महत्या; दोन चिमुकल्यांवरून पितृछत्र हरपले
सुवर्ण भारत : खेमचंद नेरकर
वरोरा तालुका,प्रतिनिधी
वरोरा : शहरातील जिजामाता वॉर्ड येथील रहिवासी सचिन सुरेश कुथे (वय ३६) यांनी स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कुथे हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत होते. आज सकाळी सुमारे ८ वाजताच्या दरम्यान त्यांची आई त्यांना उठवण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली असता, त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने परिसरातील नागरिकांना व पोलिसांना याची माहिती दिली.
सचिन कुथे यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांचा मुलगा आणि अवघी सहा महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तपासानंतरच या घटनेमागील कारण समोर येण्याची शक्यता आहे.


