बल्लारपूर मध्ये अवैध पिस्टलसह युवक जेरबंद; ४ जिवंत काडतुसे जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; शस्त्रसाठ्याच्या मागील सूत्रधाराचा शोध सुरू
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : जिल्ह्यात अवैध शस्त्रधारकांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत बल्लारपूर शहरातील एका युवकाला देशी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत काडतुसांसह अटक केली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
सलमान खान मजिद खान पठाण (वय २८ वर्षे), रा. दादाभाई नौरोजी वॉर्ड, बल्लारपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ जून २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. आरोपीच्या झडतीदरम्यान त्याच्याकडे विनापरवाना बाळगण्यात आलेले एक देशी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत राऊंड आढळून आले. पोलिसांनी तत्काळ शस्त्रसाठा जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.
जप्त करण्यात आलेल्या अग्निशस्त्र व काडतुसांची अंदाजे किंमत सुमारे ३९ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक चौकशीत आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात अप. क्र. ६५१/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीने हे शस्त्र कुठून मिळवले, त्यामागील उद्देश काय होता, तसेच या प्रकरणामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. आरोपीला पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या राजुरा उपविभागीय पथकाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, पोउपनि संतोष निंभोरकर, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा किशोर वैरागडे, पोहवा अजय बागेसर, पोअं गोपीनाथ नरोटे व शेखर माथनकर यांचा समावेश होता.
दरम्यान, जिल्ह्यात अवैध शस्त्रांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.





