कंपनीच्या सिमेंटची चोरी करून विक्री; दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
वरोरा | दि. 05 जून 2026
दिडोळा सिंचन प्रकल्पावरील एसएसएफएम (SSFM) कंपनीच्या कॅम्पमधून 40 सिमेंट बॅगा चोरी करून विकल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 4 जून रोजी रात्री सुमारे 10.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल वामनराव जिवतोडे (वय 32), हे एसएसएफएम कंपनीमध्ये स्टोअर असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत. कंपनीकडे दिडोळा प्रकल्पात सिंचनासाठी पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू असून कॅम्पमध्ये सिमेंट, लोखंडी साहित्य व इतर बांधकाम साहित्याचा साठा ठेवण्यात आलेला आहे.
4 जून रोजी रात्री जिवतोडे हे चालक अजय उपरे व सुपरवायझर अभिजित शेळके यांच्यासह स्टोअरच्या दिशेने जात असताना माढेळीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील बामर्डा फाट्याजवळ एका बोलेरो पिकअप वाहनात सिमेंटच्या बॅगा भरलेल्या दिसल्या. संशय आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग करून चौकशी केली असता, संबंधित सिमेंट दिडोळा प्रकल्पावरील कॅम्पमधून खरेदी केल्याचे वाहनातील व्यक्तींनी सांगितले.
यानंतर स्टोअरमध्ये जाऊन पडताळणी केली असता, कंपनीच्या मालकीच्या 40 सिमेंट बॅगा, अंदाजे 11 हजार रुपये किमतीच्या, चोरी करून विकल्याचे समोर आले. या प्रकरणात सुनिल शेरसिंग बाटे (वय 30) व रवी सुरेंद्र कोअरे (दोघेही सध्या दिडोळा प्रकल्प कॅम्प, मूळ रा. गोंदिया) यांची नावे निष्पन्न झाली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




