Home Breaking News कचऱ्यापासून वीज निर्मितीचा अभिनव प्रयोग; बीआयटीच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

कचऱ्यापासून वीज निर्मितीचा अभिनव प्रयोग; बीआयटीच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

150

कचऱ्यापासून वीज निर्मितीचा अभिनव प्रयोग; बीआयटीच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर, प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धन, अक्षय ऊर्जा आणि शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बीआयटी), बल्लारपूर येथील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी “Waste to Electricity Generation Using Flame-Driven Solar Energy Conversion” या विषयावरील अभिनव मिनी प्रकल्प यशस्वीरीत्या विकसित केला आहे. कचरा आणि सौर उष्णतेचा प्रभावी वापर करून वीज निर्मिती करण्याची संकल्पना या प्रकल्पातून साकारण्यात आली असून, ऊर्जा क्षेत्रातील नव्या शक्यतांना दिशा देणारा हा प्रयोग मानला जात आहे.

हा प्रकल्प मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी रोहित बिस्वास, मोहम्मद हुझैर आणि अमन सिंह यांनी संयुक्तपणे विकसित केला. वाढत्या कचरा व्यवस्थापनाच्या समस्येवर उपाय शोधण्याबरोबरच पर्यायी ऊर्जा स्रोतांचा प्रभावी वापर करण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून करण्यात आला आहे. कचऱ्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याच्या संकल्पनेमुळे पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्यास मदत होणार असून ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही हा प्रकल्प उपयुक्त ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या प्रकल्पासाठी मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख व प्रकल्प मार्गदर्शक प्रा. प्रशांत वाळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, नवकल्पनाशील विचारसरणी आणि तांत्रिक कौशल्यांचा विकास घडवून आणण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष संजय वासाडे, प्राचार्य डॉ. रजनीकांत मिश्रा, डीन अकॅडमिक्स डॉ. सत्यनारायण तसेच डीन रिसर्च डॉ. झेड. जे. खान यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना संशोधन, नवोपक्रम आणि प्रकल्पाधारित शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. याच प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी हा अभिनव प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला.

प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील प्रो. भगवत ढेकवार, प्रो. जाहिद अन्सारी, प्रो. विपीन दाभेरे, प्रो. स्नेहल बेसेकर, प्रो. अविनाश खंडेराव आणि प्रो. सतीश जाधव यांच्यासह अशैक्षणिक कर्मचाऱ्यांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभले. प्रयोगशाळेतील सुविधा, तांत्रिक सहाय्य आणि सातत्यपूर्ण सहकार्यामुळे हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्णत्वास गेला.

बीआयटीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेला हा प्रकल्प संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि शाश्वत तांत्रिक विकासाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक ठरत असून, भविष्यात ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रातील संशोधनासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.