• डिजिटल मीटरचा बल्लारपूरमध्ये वाढता वाद; अवास्तव वीजबिलांमुळे नागरिकांमध्ये संताप
• संमतीशिवाय मीटर बदलल्याचा आरोप; आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे झांमरे ने केली चौकशीची मागणी
सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर :बल्लारपूर शहरात महावितरणकडून सुरू असलेल्या डिजिटल वीज मीटर बसविण्याच्या मोहिमेवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. नागरिकांची पूर्वसंमती न घेता तसेच डिजिटल मीटरविषयी पुरेशी माहिती न देता मीटर बदलले जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. याचबरोबर डिजिटल मीटर बसविल्यानंतर वीजबिलांमध्ये झालेल्या कथित प्रचंड वाढीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील अनेक ग्राहकांनी डिजिटल मीटर बसल्यानंतर वीजबिले अचानक वाढल्याची तक्रार केली आहे. काही नागरिकांची घरे अनेक दिवस बंद असतानाही त्यांना पाच ते सहा हजार रुपयांपर्यंतची बिले आल्याचे सांगितले जात आहे. तर केवळ पंखे, दिवे यांसारख्या अत्यल्प वीज वापर असलेल्या घरांनाही हजारो रुपयांची बिले मिळत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
याहून गंभीर बाब म्हणजे सामान्य घरगुती उपकरणे वापरणाऱ्या अनेक ग्राहकांना दहा हजार रुपयांपर्यंतची वीजबिले आल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे डिजिटल मीटरच्या अचूकतेबाबत नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या आर्थिक भारामुळे सर्वसामान्य कुटुंबे चिंतेत सापडली आहेत.
नागरिकांच्या आरोपानुसार, जुना मीटर खराब झाल्यास महावितरणकडून “साधे मीटर उपलब्ध नाहीत” असे सांगून डिजिटल मीटर स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीचा अधिकार डावलला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
महावितरणच्या या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप होत असून, वाढीव वीजबिलांमुळे अनेक कुटुंबांचे मासिक आर्थिक नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे. शहरातील विविध भागांमध्ये या विषयावर तीव्र चर्चा सुरू असून नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) चे नेते प्रशांत झामरे यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. डिजिटल मीटर बसविण्याच्या प्रक्रियेची तसेच वाढीव वीजबिलांच्या तक्रारींची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महावितरण प्रशासन याबाबत काय भूमिका घेते आणि नागरिकांच्या शंकांचे निरसन कसे करते, याकडे संपूर्ण बल्लारपूर शहराचे लक्ष लागले आहे.







