Home Breaking News गडचांदूर हादरले! महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकावर गुन्हा

गडचांदूर हादरले! महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकावर गुन्हा

146
Oplus_131072

गडचांदूर हादरले! महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकावर गुन्हा

सुवर्ण भारत : रवि बंडीवार
प्रतिनिधी, गडचांदुर (कोरपना)

गडचांदूर : एका ३९ वर्षीय विवाहित महिलेच्या घरात मध्यरात्री बेकायदेशीरपणे शिरून तिची छेड काढल्याची धक्कादायक घटना गडचांदूर शहरात घडली आहे. या प्रकरणात भाजपचे नगरसेवक सूरज पांडे यांच्याविरुद्ध गडचांदूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत लोकप्रतिनिधीकडूनच अशा प्रकारचे कृत्य घडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला आपल्या मुलांसह घरी झोपली होती. तिचे पती कामानिमित्त बाहेरगावी होते. दरम्यान, घराचे दार जोरात ठोठावल्याने महिला जागी झाली. तिने दार उघडले असता समोर नगरसेवक सूरज पांडे उभे होते.
आरोपीने महिलेला विचारले की, “तुझा नवरा कुठे आहे? त्याने मला शिवीगाळ केली आहे.” असे म्हणत त्याने महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेला अश्लील स्पर्श करून, तिला ढकलत त्याने जबरदस्तीने घरात प्रवेश केला.
जीवे मारण्याची धमकी
केवळ विनयभंग करून न थांबता, “मी नगरसेवक आहे, तुला आणि तुझ्या पतीला जीवानिशी ठार मारून खोट्या गुन्ह्यात अडकवेन,” अशी धमकी देत आरोपीने दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या या कृत्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने आरडाओरडा सुरू केला. महिलेच्या मदतीसाठी शेजारी धावून येत असल्याचे पाहून आरोपीने तेथून पळ काढला.
पोलीस कारवाई
घटनेनंतर पीडित महिलेने तत्काळ गडचांदूर पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भाजप नगरसेवक सूरज पांडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ७४, ७९, ३२९(३) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
लोकप्रतिनिधीकडूनच महिलेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने गडचांदूर शहरात या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गडचांदूर पोलीस करत आहेत.