• बल्लारपूर ‘सन्मित्र चौकात’ अपघातांचे सत्र; गतिरोधक बसविण्याची मागणी
• प्रशांत झामरे यांच्या नेतृत्वात नगर परिषदेला निवेदन
सुवर्ण भारत: वैभव मेश्राम
बल्लारपूर, प्रतिनिधी
बल्लारपूर: बल्लारपूर शहरातील विद्यानगर वॉर्ड आणि मौलाना आझाद वॉर्ड यांना जोडणाऱ्या ‘सन्मित्र चौकात’ (इतिहास मत पूछो पान टपरीजवळ) अपघातांचे प्रमाण वाढले असून, या ठिकाणी तातडीने गतिरोधक (Speed Breaker) बसवावे, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नगर परिषदेकडे केली आहे.
या परिसरातील मुख्य रस्ता शाळा, महाविद्यालय आणि बाजारपेठेला जोडणारा असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी ये-जा या मार्गावरून होत असते. मात्र, वाहने भरधाव वेगाने जात असल्याने येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यातच या चौकात ५-७ किरकोळ अपघात झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याने, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत झामरे यांनी पुढाकार घेऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांना यासंदर्भात निवेदन सादर केले. जनहिताचा विचार करून या चौकात तातडीने गतिरोधक बसवण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी प्रशांत झामरे यांच्यासोबत सुरज चौबे बे, नीरज दुबे, मनीष राजभर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.







