जीवती तालुक्यात शाश्वत बांबू व्यवस्थापन, बांबू संवर्धन व लागवडीवर प्रात्यक्षिक प्रशिक्षण
महापदरवणी ग्रामसभेत समुदायाच्या सहभागातून बांबू पुनर्स्थापना उपक्रम
प्रतिनिधी – कृष्णाजी चव्हाण.
जिवती (चंद्रपूर):चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या बांबू पर्यावरणीय पुनर्स्थापना (Ecological Restoration) उपक्रमांतर्गत जीवती तालुक्यातील महापांढरवाणी या सामुदायिक वनहक्क (CFR) प्राप्त ग्रामसभेत शाश्वत बांबू व्यवस्थापन, बांबू संवर्धन आणि लागवडीवर एक दिवसीय प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेकडे सुमारे हेक्टर सामुदायिक वनसंपत्ती क्षेत्र आहे.या प्रशिक्षणात CFRMC सदस्य, ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रतिनिधी (PRI) तसेच Village Ecological Register (VER) अंतर्गत कार्यरत पॅरा-इकोलॉजिस्ट यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.प्रशिक्षणामध्ये बांबू बेटांमधील वाळलेला व मृत बांबू काढून टाकण्याचे महत्त्व त्यातून नवीन बांबू फुटव्यांच्या वाढीस मिळणारी चालना आणि बांबूची उत्पादकता वाढविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, डोंगराळ भागाचा विचार करून स्थानिक दगडांचा वापर करून ‘थवळा’तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. थवळ्यामुळे मातीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते तसेच बांबूच्या भूमिगत खोडांपासून (Rhizomes) नवीन फुटव्यांची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होते, याबाबत माहिती देण्यात आली.यावेळी शाश्वत बांबू कापणीच्या पद्धती बांबूच्या कांड्यांना क्रमांक देणे (Numbering), चिन्हांकन (Marking) करून वैज्ञानिक पद्धतीने कापणी करणे आणि दीर्घकालीन बांबू व्यवस्थापनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी त्यांच्या परिसरात आढळणाऱ्या विविध बांबू प्रजातींची स्थानिक नावे तसेच मागील हंगामातील बांबू फुलोऱ्याबाबतचे अनुभव आणि निरीक्षणे मांडली. यामुळे स्थानिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करण्यासही मदत झाली.कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी श्रमदानाच्या माध्यमातून बांबू पुनर्स्थापनेची कामे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच ही कामे मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी मनरेगा व इतर शासकीय योजनांचा उपयोग करून मजुरीचा आधार उपलब्ध करून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.या प्रशिक्षणासाठी फाउंडेशन फॉर इकॉलॉजिकल सिक्युरिटी (FES) चे पर्यावरणतज्ज्ञ मनोहर पवार आणि,संतोष पंडित, यांनी मार्गदर्शन केले. तसेच,सोयाम सर, संतोष सलाम, अनीता धुर्वे आणि सित्रु
गेडाम,जंगु कोटनाकेसरपंच,मानकू धुर्वे (गावपाटील) देवाजी कोहचाळे पोलिस पाटील मोहन आत्राम, सिताराम आडे ,तुकाराम धुर्वे,यांनी उपस्थित राहून ग्रामसभेची भूमिका, सामुदायिक सहभाग आणि बांबू पुनर्स्थापना उपक्रम पुढे नेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.या उपक्रमामुळे समुदायाच्या नेतृत्वाखाली शाश्वत बांबू व्यवस्थापन, पर्यावरणीय पुनर्स्थापना आणि सामुदायिक वनसंपत्तीचे संवर्धन यांना चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.







