• टीना उराडे, नुपूर मोडके,साक्षी वाडगुरे व अन्य उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा होतोय उद्या सन्मान!
• चंद्रपुरात रंगणार ‘वुमेन्स २४ चॅनेल’चा भव्य महिला सत्कार सोहळा!
• प्रीती कुमरे साहू व जयश्री चांडक यांचा पुढाकार!
चंद्रपूर- किरण घाटे विशेष प्रतिनिधी
समाजातील विविध क्षेत्रांत आपल्या उल्लेखनीय



कार्याने कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा आणि महिलाचलित संस्थांचा गौरव करण्यासाठी ‘वुमेन्स २४ चॅनेल’च्या वतीने उद्या (शनिवारी) ११ जुलै २०२६ रोजी एका भव्य ‘महिला सत्कार समारंभ २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.
हा दिमाखदार सोहळा चंद्रपूर येथील नागपूर रोडवरील सि.डी.सी.सि. बँकेच्या कन्नमवार भवनात सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत पार पडणार असल्याचे आयोजिका प्रीती साहू यांनी आमच्या प्रतिनिधीला आज चंद्रपूर मुक्कामी एका भेटी दरम्यान सांगितले.
या सोहळ्यात चंद्रपूरच्या नामवंत नाट्य कलावंत टीना उराडे, प्रख्यात चित्रकार नुपूर दिलीप मोडके, किनवटच्या सुप्रसिद्ध रांगोळी आर्टिस्ट तथा कलाशिक्षिका साक्षी लक्ष्मण वाडगुरे व अन्य काही कर्तृत्ववान महिलांचा त्यांच्या उल्लेखनीय उत्कृष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून महिलांच्या हक्क आणि सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर असलेल्या ‘वुमेन्स २४ चॅनेल’च्या मुख्य संपादिका प्रीती कुमरे साहू यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत आहे.
उपसंपादिका जयश्री चांडक, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी धनश्री खनके, तसेच जिल्हा संयोजिका कविता ढगे आणि दुर्गा गर्गेलवार या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहेत. महिलांच्या सुप्त गुणांना आणि त्यांच्या सामाजिक कार्याला हक्काचे व्यासपीठ देणारा हा सोहळा संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे महिला वर्गात बोलल्या जात आहे.







