Home Breaking News केरळ एक्स्प्रेसमध्ये टीटीईवर हल्ला; आरोपींसह संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे...

केरळ एक्स्प्रेसमध्ये टीटीईवर हल्ला; आरोपींसह संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे अजय दुबे यांचे निवेदन; टीटीईंच्या सुरक्षेसाठी प्रत्येक गाडीत सशस्त्र जवान तैनात करण्याची मागणी

27

केरळ एक्स्प्रेसमध्ये टीटीईवर हल्ला; आरोपींसह संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी

रेल्वेमंत्र्यांकडे अजय दुबे यांचे निवेदन; टीटीईंच्या सुरक्षेसाठी प्रत्येक गाडीत सशस्त्र जवान तैनात करण्याची मागणी

सुवर्ण भारत : वैभव मेश्राम
बल्लारपूर प्रतिनिधी

बल्लारपूर : मध्य रेल्वेच्या १२६२५ केरळ एक्स्प्रेसमध्ये वरिष्ठ तिकीट परीक्षक (टीटीई) अश्विनी कुमार लांजेवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा मध्य रेल्वे, मुंबईच्या झोनल रेल्वे वापरकर्ता सल्लागार समिती (ZRUCC) सदस्य अजय दुबे यांनी तीव्र निषेध नोंदवत, हल्लेखोरांसह त्यांना संरक्षण देणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

११ जुलै रोजी बल्लारशाह ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या १२६२५ केरळ एक्स्प्रेसमध्ये वरिष्ठ टीटीई अश्विनी कुमार लांजेवार हे नियमित तिकीट तपासणीचे कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर अजय दुबे यांनी रेल्वेमंत्र्यांना सविस्तर निवेदन पाठवून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

दुबे यांनी आपल्या निवेदनात हल्ला करणाऱ्या अवैध विक्रेत्याविरुद्ध, त्याच्या मालकाविरुद्ध तसेच अवैध विक्रेत्यांना संरक्षण देणाऱ्या रेल्वे सुरक्षा दल (RPF), शासकीय रेल्वे पोलीस (GRP) आणि वाणिज्य विभागातील संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावर कठोर शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अलीकडच्या काळात तिकीट तपासणी अधिकाऱ्यांवर प्रवासी आणि अवैध विक्रेत्यांकडून मारहाण, दमदाटी व गैरवर्तनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याची बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे दुबे यांनी नमूद केले. अशा परिस्थितीत टीटीई कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य पार पाडताना सतत भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणाचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले.

“टीटीई कर्मचारी जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. रेल्वेच्या महसूलवाढीत त्यांचे मोठे योगदान असून, गर्दीच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांचे नियोजन, नियंत्रण आणि मार्गदर्शनाची जबाबदारीही ते प्रभावीपणे पार पाडतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्याने स्वीकारली पाहिजे,” असे दुबे यांनी स्पष्ट केले.

धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये अवैध विक्रेत्यांच्या प्रवेशावर तातडीने निर्बंध घालण्याचे निर्देश रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकांना देण्यात यावेत, तसेच प्रत्येक रेल्वेगाडीत रेल्वे सुरक्षा दल किंवा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे किमान दोन सशस्त्र जवान कायमस्वरूपी तैनात करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. त्यामुळे टीटीई कर्मचाऱ्यांना निर्भय वातावरणात कर्तव्य बजावता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध निष्पक्ष चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात रेल्वे कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारच्या हल्ल्यांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस व प्रभावी धोरण राबवावे, अशी मागणी अजय दुबे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.