गडचांदूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ९५७ ग्रॅम गांजा व डोडा पावडरसह आरोपीला अटक
सुवर्ण भारत:रवी बंडीवार
प्रतिनिधी, गडचांदुर (कोरपना)

गडचांदूर : अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात गडचांदूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत गांजा व डोडा पावडर बाळगून विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत एकूण ₹२०,६४० किमतीचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ जुलै २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत गडचांदूर शहरातील वार्ड क्रमांक ६ येथे राहणारा विक्रमसिंग बहादुरसिंग भोंड (वय ४२) हा आपल्या राहत्या घरी गांजा हा अंमली पदार्थ बाळगून त्याची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. या माहितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊन पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान आरोपीच्या घरातून ९५७ ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत ₹१९,१४०) तसेच २७९ ग्रॅम डोडा पावडर (किंमत ₹१,५००) असा एकूण ₹२०,६४० किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन गडचांदूर येथे गुन्हा क्रमांक ३९१/२०२६ अन्वये कलम ८(क), २०(ब)(ii)(A) व १५(a), एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या पार पडली.
या मोहिमेत सपोनि. सुखदेव गोदे, पोउपनि. पंकज हेकाड, पोउपनि. गणेश अनभुले, मपोउपनि. राधिका गायकवाड, नापोअं. बलवंत शर्मा, पोअं. मनोहर जाधव, साईनाथ उपरे, सुरज ढोले, प्रकाश बाजगीर, दत्ता चव्हाण आणि मपोअं. सरिता येरगुडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
गडचांदूर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






