• घुग्घुसमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ भव्य रॅली
• नीट गैरव्यवहाराच्या निष्पक्ष चौकशी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
घुग्घुस : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी घुग्घुस शहरात सोमवारी भव्य रॅली काढण्यात आली. घुग्घुस परिवार, सर्व विद्यार्थी संघटना तसेच विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांच्या संयुक्त पुढाकाराने आयोजित ही रॅली शांततेत आणि मोठ्या उत्साहात पार पडली.
सकाळी १ वाजता गांधी चौकातून रॅलीला सुरुवात झाली. हातात तिरंगा आणि बॅनर घेऊन नागरिक, विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. रॅली गांधी चौक → बँक ऑफ इंडिया → पोलीस ठाणे मार्गे बसस्थानक चौकापर्यंत पोहोचली. संपूर्ण मार्गावर “सोनम वांगचुक यांना न्याय द्या”, “विद्यार्थ्यांशी खेळू नका”, “पारदर्शक शिक्षण हवेच” अशा घोषणा देण्यात आल्या.
प्रमुख मागण्या
रॅलीच्या समारोपानंतर बसस्थानक चौकात झालेल्या सभेत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारकडे खालील मागण्या केल्या:
– केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा
– नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करावी
– पारदर्शक, न्याय्य आणि विद्यार्थी-केंद्रित परीक्षा व शिक्षण व्यवस्था लागू करावी
– विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठोस आणि प्रभावी धोरणे तातडीने राबवावीत
या रॅलीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक, पालक तसेच शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. महिला वर्गाची उपस्थितीही लक्षणीय होती.
रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण रॅली शांततापूर्ण वातावरणात पार पडल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
आंदोलकांनी इशारा दिला की, जर मागण्यांची त्वरित दखल घेतली नाही तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.







