ब्रह्मपुरीत NEET पेपरफुटीवरून भाजप-काँग्रेस आमनेसामने; घोषणाबाजीने परिसर दणाणला
ब्रह्मपुरी : देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरीत भाजप युवा मोर्चा आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
भाजप युवा मोर्चाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी शहरातून मोर्चा काढत काँग्रेस कार्यालय गाठले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने कार्यालयासमोर जमून भाजपच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्याने वातावरण तापले.
परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण होताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळे केले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तनय देशकर यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा राजकीय हेतूंसाठी वापर होत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या आंदोलनाचा निषेध केला. तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांनी NEET प्रकरणातील गैरव्यवहार, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि संबंधित केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असल्याचे सांगत भाजपच्या मोर्च्याला काँग्रेसने प्रत्युत्तर दिल्याचे स्पष्ट केले.







