Home Breaking News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूरमध्ये रक्तदानाचा महायज्ञ; शेकडो रक्तदात्यांचा उत्स्फूर्त...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूरमध्ये रक्तदानाचा महायज्ञ; शेकडो रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

22

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

वाढदिवसानिमित्त बल्लारपूरमध्ये रक्तदानाचा महायज्ञ; शेकडो रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

बल्लारपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, बल्लारपूरच्या वतीने राणी हिराई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.

शिबिराला भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शहराध्यक्ष ॲड. रणंजय सिंह तसेच यूथ क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी रक्तदात्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन केले.

यावेळी ॲड. रणंजय सिंह यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू व प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची भारतीय जनता युवा मोर्चाची परंपरा कायम ठेवत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

यावेळी मान्यवरांनी रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते, असे सांगत नागरिकांनी नियमित रक्तदानाचा संकल्प करावा, असे आवाहन केले. समाजात रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता युवा मोर्चा, बल्लारपूरचे अध्यक्ष मिथलेश खेंगर, सहसंयोजक तथा दक्षिण भारतीय प्रकोष्ठाचे अध्यक्ष प्रशांत दारला, महामंत्री रामेश्वर पासवान, विकी (शांतीकुमार) लालवानी, अरविंद वर्मा, सुधाकर पारधी तसेच सोशल मीडिया प्रमुख यश नील यांनी विशेष परिश्रम घेतले.

या रक्तदान शिबिरात भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना जोपासत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून “रक्तदान – महादान, मानवसेवा हीच सर्वोच्च सेवा” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.