• शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहाराविरोधात
• ब्रह्मपुरी बंद; रस्ता रोको, मुंडण आंदोलन, पुतळा दहन
सुवर्ण भारत: रोहित मेश्राम
तालुका प्रतिनिधी, ब्रम्हपुरी

ब्रह्मपुरी : देशातील शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार, नीट परीक्षा प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ गुरुवारी ब्रह्मपुरी शहरात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), खोरीपा व वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान शहर बंद ठेवण्यात आले असून, निषेध बाइक रॅली, मोर्चा, रस्ता रोको, मुंडण आंदोलन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले.
सकाळी शहरातून निषेध बाइक रॅली काढण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले. केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत ख्रिस्तानंद चौकाकडे मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक तिरडीसह शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व गृहमंत्री अमित शाह यांच्या पुतळ्यांची अंत्ययात्रा काढली.
ख्रिस्तानंद चौकात आंदोलकांनी पुतळ्यांना चपलांचा हार घालून दहन केले. तसेच रस्त्यावर ठिय्या देत ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी मुंडण करून निषेध व्यक्त केला.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत सुमारे दहा प्रमुख आंदोलकांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. यामध्ये कॉ. विनोद झोडगे, खेमराज तिडके, योगेश मिसार, प्रमोद चिमुरकर, डॉ. राजेश कांबळे, हितेंद्र राजूत, जगदीश पिलारे, नरेंद्र गाडगीळवार, अमित कन्नाके व मुकुंद राजूत यांचा समावेश होता.
आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी केली. तर आंदोलन शांततेत पार पडले असले तरी त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत जनतेतील नाराजी स्पष्टपणे दिसून आल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.






