• लॉयड्स फाउंडेशनचा युवकांसाठी 7 महिने मोफत प्रशिक्षण उपक्रम
• “शिकत राहा, आत्मविश्वासाने पुढे जा आणि संधीचे सोने करा: लॉयड्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी”

घुग्घुस, २५ जुलै : ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराभिमुख करून त्यांना सर्जनशील क्षेत्रात करिअरच्या संधी देण्यासाठी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन आणि आर्टेंट एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घुग्घुस येथे आज ‘चित्रकला, सर्जनशील कला, डिझाईन व रोजगार कौशल्य’ या ७ महिन्यांच्या मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली.
जी. डी. गोयंका लॉयड्स पब्लिक स्कूल, घुग्घुस येथे २५ आणि २६ जुलै रोजी दोन दिवसीय परिचय व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरापर्यंत जाण्याची गरज संपणार
आजच्या काळात ग्राफिक डिझाईन, डिजिटल माध्यम, व्हिडिओ एडिटिंग आणि संगणक आधारित सर्जनशील कौशल्यांना उद्योगांमध्ये मोठी मागणी आहे. मात्र ग्रामीण भागातील तरुणांना दर्जेदार प्रशिक्षणासाठी शहरांपर्यंत जावे लागते. ही दरी भरून काढण्यासाठीच उसगाव, मूर्स, बेलसणी, साखरवही, शेनगाव, पांढरकवडा, नकोडा आणि घुग्घुस परिसरातील १७ वर्षांवरील युवक-युवतींना त्यांच्याच भागात प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी डिझाईन थिंकिंग कार्यशाळेचे उद्घाटन लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष *श्री. प्रशांत पुरी* यांच्या हस्ते झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. पुरी म्हणाले,
“आजच्या काळात सर्जनशील कौशल्यांना मोठी मागणी आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये मिळतील. स्थानिक तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे. शिकत राहा, आत्मविश्वासाने पुढे जा आणि प्रत्येक संधीचे सोने करा.”
उद्योग तज्ज्ञांशी संवाद आणि करिअर मार्गदर्शन
या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे क्रिएटिव्ह इंडस्ट्रीतील तज्ज्ञांसोबतची पॅनल चर्चा. यात ग्राफिक डिझाईन, व्हिज्युअल कम्युनिकेशन, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, ब्रँडिंग, जाहिरात, अॅनिमेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रांतील संधींबाबत माहिती देण्यात आली. स्वतंत्र व्यावसायिक म्हणून काम कसे करावे, पोर्टफोलिओ कसा तयार करावा आणि क्लायंट कसे मिळवावेत याचेही मार्गदर्शन झाले.
आर्टेंट एज्युकेशन फाउंडेशनच्या सहसंस्थापिका श्रीमती अरुणिमा सेनगुप्ता यांनी पुढील ७ महिन्यांच्या अभ्यासक्रमाची माहिती दिली.
७ महिने पूर्णपणे मोफत प्रशिक्षण
अंतिम निवड झालेल्या ३० विद्यार्थ्यांना पुढील ७ महिने पूर्णपणे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात समाविष्ट आहे:
*कला व डिझाईन:* ड्रॉइंग, स्केचिंग, पेंटिंग, ओरिगामी, लोगो डिझाईन, ब्रँडिंग
*डिजिटल कौशल्ये:* फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, पोर्टफोलिओ तयार करणे
*करिअर तयारी:* व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, मुलाखत तयारी
*अनुभव:* तज्ज्ञांचे मार्गदर्शन, इंडस्ट्री भेटी, लाईव्ह प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप आणि प्लेसमेंट सहाय्य
*८३ अर्ज, ३० जागा*
या उपक्रमाला परिसरातील युवक-युवतींकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. एकूण ८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वांची वैयक्तिक मुलाखत घेऊन त्यातून ३० विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाईल. निवड प्रक्रियेत सर्जनशीलता, शिकण्याची इच्छा आणि बांधिलकी याला प्राधान्य असेल.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन, आर्टेंट एज्युकेशन फाउंडेशन आणि जी. डी. गोयंका लॉयड्स पब्लिक स्कूलच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.






