निधन वार्ता
घुग्घूस : बहिरमबाबा नगरातील ज्येष्ठ नागरिक रमाबाई पडवेकर यांचे निधन
पत्रकार संजय पडवेकर यांच्या मातोश्रींच्या जाण्याने परिसरात हळहळ
घुग्घूस, २६ जुलै २०२६ घुग्घूस येथील बहिरमबाबा नगर, प्रभाग क्रमांक ३ मधील रहिवासी आणि अत्यंत मृदू स्वभावाच्या रमाबाई महादेव पडवेकर वय ६९ यांचे शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी दुःखद निधन झाले.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी त्यांना अचानक छातीत दुखू लागले. कुटुंबियांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली
रमाबाई पडवेकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी २ वाजता घुग्घूस येथील बौद्ध स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप देणार आहेत.
त्यांच्या पश्चात पती महादेव पडवेकर, दोन मुले, एक मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. रमाबाई या घुग्घूसमधील प्रसिद्ध पत्रकार संजय पडवेकर यांच्या मातोश्री होत्या. गेली अनेक वर्षे त्या बहिरमबाबा नगरात कुटुंबासह वास्तव्यास होत्या. परिसरातील सर्वांशी आपुलकीने वागणे आणि मदतीचा हात पुढे करणे हा त्यांचा स्वभाव होता.
रमाबाईंच्या निधनाची वार्ता कळताच पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी पडवेकर कुटुंबियांना सांत्वनपर भेटी दिल्या.

रमाबाई पडवेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि पडवेकर परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, हीच सर्वांची प्रार्थना.






